15 लाख 30 हजार लंपास : दोन, तीन वेळा चोरी केली
प्रतिनिधी/ सातारा
एखाद्या मोठय़ा दुकानात मालकाचे दुर्लक्ष झाले तर काय घडू शकते याचेच प्रत्यंतर पोवईनाक्यावरील नवरंग दुकानाच्या मालकांना आले. माल खपत होता मात्र गल्ल्यात पैसे कमी भरत होते. नेमके काय चाललेय याचा शोध घेताना दुकानातील सीसीटीव्ही फुटेज कामी आली आणि चक्क दुकानातील कामगारच चोरी करत असल्याचे समोर आल्याने दुकानाच्या मालकांना धक्काच बसला. या कामगाराने दोन, तीन वेळा चोरी करत एकूण 15 लाख 30 हजार रुपये चोरल्याचे समोर आले. त्यानंतर मग त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली.
सातारा शहरातील पोवईनाक्यावरील प्रख्यात नवरंग कपडय़ाच्या दुकानातून 15 लाख 30 हजार रुपये लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत नवरंग दुकानात कामास असलेला कामगार साहिल हकीम (रा. वनवासवाडी, ता. सातारा) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशांत बाळकृष्ण नावंधर (वय 46) रा. रविवार पेठ, सातारा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, पोवईनाका येथील नवरंग कापड दुकानामध्ये दि. 28 सप्टेंबर रोजी पहाटे 2.58 वाजता व यापूर्वी दोन, तीन वेळा दुकानातील कामगार साहिल हकीम रा. वनवासवाडी, ता. सातारा याने दुकानाच्या वरील मजल्यावरील होलसेल विभागाच्या खिडकीतून आत प्रवेश करून दुकानातील पूर्वमुखी कॅश व पश्चिम मुखी कॅश काऊंटरमधून तसेच याआधी सिल्क पॅलेसचे 8 लाख 30 हजार, नवरंगचे 4 लाख 10 हजार आणि नवरंग कलेक्शनचे 2 लाख 90 हजार असे एकूण 15 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम माझ्या संमतीशिवाय लबाडीने चोरुन नेली आहे.
नावधंर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कामगार साहिल हकीम याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि माने करीत आहेत. एकाच दुकानातून एवढय़ा मोठय़ा रकमेची चोरी वेळोवेळी करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यामुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. मार्च 2020 नंतर सलग तीन महिने लॉकडाऊनमुळे आधीच कापड विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. लॉकडाऊन उठविल्यानंतर कापड विक्रेते आपल्या व्यवसायाची घडी बसविण्याचा प्रयत्न करत असतानाच चोरीची घटना घडल्यामुळे कापड विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








