ऑनलाईन टीम
पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहानंतर पक्षश्रेष्ठीना पंजाबमध्ये मोठे बदल केले. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेत चरणजीत सिंह चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली. यानंतर कॉंग्रेसमधील वाद थांबतील अशी चिन्हे दिसत होती. मात्र काही दिवसातच नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत धक्का दिला. मात्र काही दिवसातच त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. सिद्धू यांनी हा राजीनामा मागे घेतला असला तरी पंजाब काँग्रेसमधील हे नाराजीनाट्य काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे.
नाराज असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि यानंतर राजीनाम्याचा आपला निर्णय मागे घेत पुन्हा एकदा धक्का दिला. राहुल गांधी भेटीनंतर बोलताना त्यांनी आपल्याला वाटत असलेली काळजी, विचार आपण त्यांच्यासमोर मांडले असून आता सर्व काही ठीक झालं असल्याचं सांगितलं. पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी राजीनामा मागे घेत पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली जाईल असं आश्वासन दिले असल्याचेही हरीश रावत यांनी सांगितले.
सिद्धू यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर ते काँग्रेसलाही सोडचिठ्ठी देतील असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र दसऱ्याच्या मुहुर्तावर राहुल गांधी यांची भेट घेत सिद्धू यांनी राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं. “मी हायकमांडला माझ्या मनात असणाऱी काळजी सांगितली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी जो काही निर्णय घेतील तो पंजाबसाठी असेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्यांनी सर्वोच्च मानत असून त्यांच्या आदेशाचं पालन करत आहे,” असं सिद्धू यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितलं.
Previous Articleजिल्ह्यात 47 नवे बाधित
Next Article CRPF बटालियन नेणाऱ्या रेल्वेत स्फोट; 6 जवान जखमी









