दरभंगा येथे प्रचारसभा : राम मंदिर मुद्दय़ावरून टीका
वृत्तसंस्था / पटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. दरभंगा येथे झालेल्या जाहीर प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीवरून विरोधकांना टोला लगावला. “आज सर्वांची नजर अयोध्येवर आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. राम मंदिराची तारीख विचारणारे आता गप्प झाले आहेत’’ अशी टोलेबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
दरभंगा येथील प्रचारसभेवेळी पंतप्रधानांनी शेतकऱयांना दिल्या जाणाऱया मदतीवरही भाष्य केले. लाखो शेतकऱयांपर्यंत कृषी सन्मान योजनांचा फायदा पोहोचवण्यापासून प्रत्येक गरीब व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचे काम आपल्या सरकारने केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. बिहारच्या प्रत्येक गरीब व्यक्तीलाही अशा योजनांचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनविकासासाठी सरकार कटिबद्ध सरकारी पातळीवर भ्रष्टाचार कमी करण्यात आपले सरकार यशस्वी झाले असून विकासाच्या अनेक योजनाही सरकारने प्रत्यक्षात आणलेल्या आहेत. केंद्रात रालोआचे सरकार आल्यानंतर कोसी महासेतूचे काम जलदगतीने सुरू झाल्यामुळे आता येथील विकासाला गती मिळाली आहे. भविष्यात जनविकासासाठी आपले सरकार कटिबद्ध असेल, असेही ते पुढे म्हणाले.









