अध्याय सविसावा
नाथ महाराज सद्गुरूंचे महात्म्य सांगताना म्हणाले, साधकाला देवाची माया भुलवायला येते त्यावेळी त्याने भक्तीभावाने गुरुराजाचे स्मरण केले असता मायेची पीडा विलयास जाते. माया ही त्रिगुणांनी युक्त असते. त्यामुळे साधकाला निरनिराळय़ा इच्छा होत असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरु होते पण जो सद्गुरूंचे स्मरण करत असतो त्याच्याबरोबर सद्गुरू असल्याने ते त्याला सावध करतात. हे जग मिथ्या असून साधक हा ईश्वराचा अंश असल्याचे स्मरण त्याला वेळोवेळी देतात. त्यामुळे आहे त्यात समाधानी राहणे हेच महत्वाचे आहे हे त्याच्या लक्षात येते आणि त्याला वैराग्य वश होते.
अशाप्रकारे सद्गुरुंचे केवळ एक नाम मोठमोठय़ा दोषांची बाधा दूर करते आणि लौकिक वैराग्य उत्पन्न करते, तेणेकरून साधकांना मोठे सुख होते. खरे पाहिलं तर साधकाला निर्वेध सुख देणारा एक सद्गुरुच आहेत. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले असता साधकांना सुखाचा लाभ होतो. या अध्यायाच्या निरुपणाला नाथ महाराज आता सुरवात करत आहेत. पंचविसाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी असे सांगितले की, सद्गुरू हे माझे सगुण रूप आहे त्यांची भक्ती केली असता ते माझ्या निर्गुण स्वरुपाची ओळख करून देतात. माझ्या सर्व व्यापित्वाची अनुभूती मिळवून देतात. त्यातून माझ्या निर्गुण स्वरुपाची प्राप्ती व्हावी अशी साधकाला आस लागते कारण निर्गुण हाती आले म्हणजे साधक सुखसंपन्न होतो. निर्गुण स्वरूप प्राप्त होण्याचा हमखास उपाय म्हणून माझे भजन करावे. भक्तिभावाने भगवद्भजन करु लागले असता त्यात विघ्न येते. ते विघ्न निवारण करण्याकरिता माझे नामस्मरण करीत जावे. भगवंतांच्या या सांगण्यावर नाथ महाराज म्हणतात, अच्युत ह्या नामाचे स्मरण केले असता ते आपल्या प्रभावानेच कर्माकर्माचा नाश करते व सर्व पातकांचे भस्म करून टाकते. इतके सामर्थ्य हरीच्या नामात आहे. नामानेच मनुष्य विरक्त होतो, नामानेच चित्त निर्मळ होते, नामानेच गुणातीतता प्राप्त होते व नामानेच संसारपाश तुटतात. नामामध्ये चित्त लोलुप झाले असता तेथे संसारभयाचा शिरकाव होत नाही. असा ज्याचा नामावर विश्वास असतो, त्याच्यावर भगवान् प्रसन्न आहे असे समजावे. दुष्टाच्या संगतीने जरी विषयासक्त मनुष्य विषयातच पूर्णपणे रममाण झालेला असला, तरी त्याला पश्चात्ताप होताच तोही अर्ध्या क्षणात विरक्त होतो. मोठमोठय़ा दोषांना पश्चात्ताप हेच खरोखर मोठे प्रायश्चित्त आहे. अनुताप झाल्याशिवाय प्रायश्चित घेणे ती केवळ थट्टा होय. पश्चात्तापासारखा मित्र ह्या जगामध्ये दुसरा नाही. एकदा पश्चात्ताप झाला की तो सर्व पातकांचे भस्म करून सोडतो. पश्चात्ताप हाती आला की, तो क्षणार्धात विरक्त करून सोडतो. याच अर्थाचे निरुपण भगवंत उद्धवाला सांगत आहेत. ज्याचे चित्त विषयासक्त असेल त्याला विरक्त होण्याकरिता आवश्यक ती प्रस्तावना भगवंत करत आहेत.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन असलेले हे शरीर मिळाल्यावर जो माझी भक्ती करतो, तो प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेल्या मला आनंदस्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. थोडक्मयात मी भावाचा, भक्ताच्या प्रेमाचा भुकेला असल्याने भक्ताने भक्तीच्या माध्यमातून माझ्यावर केलेल्या प्रेमाने मलाही त्याच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते आणि मी त्याला माझ्यात सामावून घेतो. नरदेह म्हणजे घबाड आहे कारण नरदेहामध्येच ब्रह्म पूर्णपणे जाणण्याचे सामर्थ्य आहे. ब्रह्म पूर्णपणे जाणणे हेच ह्या नरदेहाचे मुख्य कर्तव्य आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन असलेले हे शरीर मिळाल्यावर जो माझी भक्ती करतो, तो प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेल्या मला आनंदस्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. मी भावाचा, भक्ताच्या प्रेमाचा भुकेला असल्याने भक्ताने भक्तीच्या माध्यमातून माझ्यावर केलेल्या प्रेमाने मलाही त्याच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते आणि मी त्याला माझ्यात सामावून घेतो. नरदेह म्हणजे घबाड आहे कारण ब्रह्म पूर्णपणे जाणण्याचे सामर्थ्य नरदेहातच असते. देवादिक सुद्धा नरदेह प्राप्त व्हावा म्हणून धडपडत असतात कारण देवयोनी ही भोगयोनी असल्याने त्यातून ब्रह्म जाणण्याचे ज्ञान मिळू शकत नाही.
क्रमशः








