महापालिकेचा प्रस्ताव : आमदार, रहदारी पोलीस अधिकारी-मनपा आयुक्तांनी केली पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
बाजारपेठेत फेरीवाल्यांची आणि पार्किंगची समस्या भेडसावत आहे. विशेषतः गणपत गल्ली, कांदा मार्केट आणि नरगुंदकर भावे चौक अशा विविध भागात मोठय़ा प्रमाणात समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे या समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने हॉकर्स झोनची आवश्यकता आहे. याकरिता आमदार अनिल बेनपेंसह महापालिका आयुक्त आणि रहदारी पोलीस खात्याच्या अधिकाऱयांनी गणपत गल्लीत सोमवारी पाहणी केली.
फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः बाजारपेठेतील व्यापाऱयांना याचा अधिक त्रास होत आहे. रस्त्याशेजारी मार्किंग करूनही फेरीवाले रस्त्यांमध्येच ठाण मांडतात. काही फेरीवाले रस्त्याच्या मध्यभागीच व्यवसाय थाटतात. परिणामी रहदारी कोंडी निर्माण होऊन वाहनधारकांना याचा फटका बसतो. त्यामुळे शहरातील फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन निर्माण करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पण जागेअभावी हॉकर्स झोन निर्माण करण्यात आले नाहीत. सध्या शहरात फेरीवाल्यांची समस्या खूपच जटील बनली आहे.
त्यामुळे आमदार अनिल बेनके यांनी सोमवारी महापालिका आयुक्त रुदेश घाळी आणि रहदारी खात्याच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्यासह शनिवार खूटपासून गणपत गल्लीमार्गे नरगुंदकर भावे चौकापर्यंत फेरफटका मारून रहदारीचा आढावा घेतला. ठिकठिकाणी भाजीविपेते, फेरीवाले बसले होते. नेहमी रस्त्यावर बसणारे फेरीवाले पोलिसांची वाहने पाहून रस्त्याच्या बाजूला आपल्या हातगाडय़ा लावून थांबले होते. सदर परिस्थितीची पाहणी करून फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासंदर्भात चर्चा करण्यात आली.
महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये तसेच नरगुंदकर भावे चौकात भाजी विपेत्यांसाठी सुविधा करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी आमदारांना सांगितले. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून फेरीवाल्यांसाठीही आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
कांदा मार्केट, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी मार्किंग करून व्यावसायिकांसाठी सुविधा केली जाईल. त्यानंतर रस्त्यावर कोणी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. याबाबत कृती आराखडा तयार करून रहदारी पोलीस आणि महापालिकेची संयुक्त बैठक घेऊन अंमलबजावणी करा, अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी केली.









