नमन नाटय़ मंडळांचे साहित्य पुस्तक रुपाने होणार जतन
वार्ताहर/ संगमेश्वर
पारंपारिक नमन मंडळे नमन नाटय़ातून लोककला जपण्याचे काम करीत आहेत. कोरोनामुळे नमन मंडळांना लाखो रुपयांचा फटका बसला असल्याने नमन मंडळांनी एकत्र येणे आवश्यक आहे. नमन स्पर्धेमध्ये सर्व मंडळांनी एकत्र येवून स्पर्धेला उतरल्यास संगमेश्वर तालुक्याचे नाव आणखीन रोशन होईल असे प्रतिपादन जि.प.सदस्य संतोष थेराडे यांनी व्यक्त केले.
कडवई येथील विजय कुवळेकर यांच्या कार्यालयात आयाजित तालुका नमन नाटय़ मंडळाच्या सभेला ते बोलत हेते. यावेळी व्यासपीठावर मराठी अभिनेते डॉ भगवान नारकर,माजी पंचायत सभापती कृष्णाजी हरेकर,संतोष डावल,अरविंद जाधव,विजय कुवळेकर,प्रविण टक्के,युयुत्सू आर्ते,कृष्णा जोगळे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी नमनाचा गंध नसलेला स्पर्धेत बाजी मारुन जातो. मात्र गेले अनेक वर्षे परंपरा जोपासणारी नमन मंडळे मागे पडतात. त्यामुळे स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी आणि नमन नाटय़ मंडळांना उंची प्राप्त करण्यासाठी तालुक्यातील नमन मंडळांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी माझे हवे ते सहकार्य नमन मंडळांना देण्यास मी तयार आहे. नमन नाटय़ांमध्ये काम करणारे कलाकार हे रात्री नाटय़ाचा प्रयेग करुन सकाळी परत आपल्या कामाला जातो. 24 तास काम करण्याची मानसिकता असताना आपले कलाकार मागे पडत आहेत. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज संतोष थेराडे यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका नमन मंडळाचे अध्यक्ष प्रविण टक्के यांनी सर्व मंडळांनी एकत्र येण्याचे उद्दीष्टय़ सांगण्यात आले. नमन नाटय़ मंडळाचे साहित्य पुस्तक रुपात प्रसिध्द करुन ते जतन करण्याचे काम नमन मंडळाच्यावतीने हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी नमन नाटय़ मंडळांतील जेष्ठ सदस्यांनी मार्गदर्शन केले. तसेच जेष्ठांचा सत्कार मंडळाच्यावतीने करण्यात आला. यावेळी नाटय़ मंडळाच्या विविध समस्यांवर तसेच पुढील नियोजनावर चर्चा करण्यात आली. सभेचे सुत्रसंचलन श्री चांदे यांनी केले.








