सेन्सेक्स 695 अंकांनी गडगडला : निफ्टी 12,900 च्या खाली
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ाचा प्रवास तेजीच्या मजबूतीसह केल्यानंतर तिसऱया दिवशी मात्र बुधवारी नफा कमाईच्या दबावामुळे सेन्सेक्स 695 अंकांनी कोसळला आहे. प्रामुख्याने दिवसभरातील कामगिरीत एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि कोटक बँक यांच्या समभागातील नफा कमाईमुळे बाजार घसरणीसह बंद झाला आहे.
बीएसईमधील नफा कमाईच्या वातावरणामुळे सेन्सेक्स दिवसअखेर 694.92 अंकांनी घसरुन निर्देशांक 43,828.10 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 196.75 टक्क्यांच्या घसरणीसह निर्देशांक 12,858.40 वर बंद झाला. निफ्टीने काही काळ 13,145.85 चा टप्पा गाठला होता. तसेच सकाळी सेन्सेक्सही जवळपास 300 अंकांची वाढ दर्शवत होता. दुपारच्या सत्रात बाजाराने एकदम युटर्न घेतल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या समभागातील नफा कमाईने कोटक बँकेचे समभाग सर्वाधिक 3 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. तसेच ऍक्सिस बँक, सन फार्मा, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि एशियन पेन्ट्सचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला ओएनजीसी, पॉवरग्रिड आणि इंडसइंड बँकेचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.
मागील काही दिवस शेअर बाजारात नफा कमाईची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु तो क्षण चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी पहावयास मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आशियात शांघायसह सोल हे नुकसानीत राहिले आहेत. तर टोकीयो व हाँगकाँगचे शेअर बाजार नफ्यात राहिले आहेत. युरोपातील प्रमुख बाजारांनी मात्र प्रारंभीच्या काळात मिळता-जुळता कल प्राप्त केला होता.
कोटय़वधी रुपये बुडाले
मोठय़ा प्रमाणात नफा कमाई झाल्याने गुंतवणूकदारांचे जवळपास 2 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. 24 नोव्हेंबर रोजी बीएसई लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 174.82 लाख कोटींवर राहिले होते.









