पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन
प्रतिनिधी /सांखळी
नद्यांमधील गाळ न उपसल्याने जलप्रलय झाला. सरकारी अधिकाऱयांनी यावर उपाययोजना करायला हवी. आपत्ती व्यवस्थापनने पावसाळय़ापूर्वी नदीची पाहणी करून पाण्याला कुठेही अळथळा येणार नाही ना, याची खात्री करणे आवश्यक आहे. ते न झाल्याने नदीच्या पात्रात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने पुराच्या पाण्याची पातळी वाढली. जे काही झाले ते भयानक होते, ते पाहून आपल्याला खूप वाईट वाटले, असे सांखळी मतदारसंघात भामई पाळी या ठिकाणी पूरग्रस्तांना भेटण्यासाठी आलेल्या केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
पूरग्रस्तांनी आपल्या संपूर्ण नुकसानीची माहिती सरकारी अधिकाऱयांकडे द्यावी. उपजिल्हाधिकारी, मामलेदार, तलाठी अहवाल तयार करत असून ज्याच्या घराचे नुकसान झाले त्यांनी पूर्ण घराचे नुकसान किती झाले हे सांगावे, कारण आता त्यांना पूर्ण नवीन घर बांधावे लागणार आहे. नुकसानीचे अहवाल गोवा सरकार आणि केंद्र सरकारकडे जाणार असून नुकसानग्रस्त लोकांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील, असे श्रीपाद नाईक या विषयी बोलताना म्हणाले
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, सरपंच प्रशिला गावडे, पंच उमेश नाईक, उपजिल्हाधिकारी दीपक वायगणकर यांची उपस्थिती होती.









