साडी संरक्षक पाईपमध्ये अडकून बचावली
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर शहरातील महामार्गावर असलेल्या मलप्रभा नदी पुलावरून उडी टाकून एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उडी मारताना साडी पुलाच्या संरक्षक कठडय़ाच्या पाईपमध्ये अडकल्याने तिचा तो प्रयत्न फसल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. सदर महिलेचे नाव बसव्वा सुरेश वालीकर (वय 60, रा. पिरनवाडी) असे असल्याचे उघडकीस आले.
आजाराला कंटाळून त्या महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गुरुवारी सकाळीच खानापूर गाठले. त्यानंतर चालत जाऊन मलप्रभा नदीवरील पुलावरून उडी मारली, पण उडी मारत असताना तिची साडी संरक्षक कठडय़ाच्या तुटलेल्या पाईपमध्ये अडकल्याने साडी काढण्याचा तिने प्रयत्न केला. तेवढय़ात पुलावरून जाणाऱया काही पादचाऱयांनी हा प्रकार पाहून त्या ठिकाणी धाव घेतली. त्या महिलेला पुलावरून त्वरित बाजूला घेऊन तिची समजूत घातली. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, पोलीस उपनिरीक्षक शरणेश जालीहाळ घटनास्थळी आले. ती महिला अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. त्या अधिकाऱयांनी चौकशी केली, पण तिने नाव सांगितले नाही. काही वेळानंतर तिने आपली ओळख सांगितली. किडनी आजाराला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी येथे उडी मारल्याचे तिने सांगितले. ओळख सांगितल्याने पोलिसांनी पिरनवाडीला जाऊन महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.









