प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ात कृष्णेसह सर्व नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. या नद्यांच्या काठावर नागरिकांना ठेवणे धोकादायक आहे. यामुळेच संभाव्य स्थितीची खबरदारी म्हणून संबंधित नद्यांच्या काठावर राहणाऱया गावातील नागरिकांना मदत केंद्रांमध्ये हलविण्यात यावेत, असा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. या आदेशाचे पालन करण्याची सूचना जिल्हय़ातील सर्वसंबंधित अधिकारी वर्गाला देण्यात आली.
मंगळवारी माहिती व महसूल खात्याच्या अधिकारी वर्गाने बेळगाव जिल्हय़ातील महत्वाच्या अधिकाऱयांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाप्रमाणे कामकाज चालविण्याची सूचना केली आहे. मागील आठवडय़ापासून होत असलेला पाऊस धोकादायक ठरत आहे. जिल्हय़ातून प्रवाहित होणाऱया सर्व नद्यांची पात्रे भरली असून जलाशयेही तुडुंब आहेत. जलाशयांमधून होणारा विसर्ग नद्यांची पात्रे सोडून पाणी गावांमध्ये शिरण्यास जबाबदार ठरण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या त्या गावच्या नागरिकांना वेळीच हलविण्यात यावे, असे बैठकीत सांगण्यात आले.
अधिकारी वर्गाने नजीकच्या महाराष्ट्र राज्यातून सोडल्या जाणाऱया पाण्याबद्दल सातत्याने माहिती घ्यावी. नागरिकांना वेळेत मदतकेंद्रात हलवून त्याठिकाणी सर्व सोयी उपलब्ध कराव्यात. पाण्याचा जोर ओसरल्यानंतर संबंधित नागरिकांना पुन्हा आपापल्या गावी जाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.









