बेरेटिनी, मोनफिल्स, कीज, पेगुलाही विजयी, व्हेरेव्ह, अझारेन्का, ऍनिसिमोव्ह, सॅकेरी पराभूत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
स्पेनच्या सहाव्या मानांकित राफेल नदालने फ्रान्सच्या ऍड्रियन मॅनारिनोचे आव्हान संपुष्टात आणत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. चौदावा मानांकित डेनिस शॅपोव्हॅलोव्ह, फ्रान्सचा गेल मोनफिल्स, इटलीचा जागतिक सातवा मानांकित मॅटेव बेरेटिनी यांनीही शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. महिलांमध्ये अग्रमानांकित ऍश्ले बार्टी, प्रेंच ओपन चॅम्पियन बार्बोरा पॅसिकोव्हा, मॅडिसन कीज, जेसिका पेगुला यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. तिसरा मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्ह, पाब्लो कॅरेनो बुस्टा, व्हिक्टोरिया अझारेन्का, पॉला बेडोसा, मारिया सॅकेरी, अमांदा ऍनिसिमोव्हा यांचे आव्हान संपुष्टात आले.

राफेल नदालने मॅनारिनोवर 7-6 (16-14), 6-2, 6-2 अशी मात करीत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. ही लढत सुमारे अडीच तास चालली होती. यातील पहिल्या सेटमध्ये दोघांचा तोडीस तोड खेळ झाल्याने सेट टायब्रेकवर गेला. त्यातही दोघांमध्ये जोरदार चुरस पहावयास मिळाली. दोघांनी तीन सेटपॉईंट वाचविले. सातव्या सेटपॉईंटवर नदालने बाजी मारत हा सेट जिंकला. दुसऱया व तिसऱया सेटमध्ये मॅनारिनोकडून फारसा प्रतिकार झाला नाही. नदालने या सामन्यात 16 बिनतोड सर्व्हिस केल्या. कॅनडाच्या शॅपोव्हॅलोव्हने तिसऱया मानांकित व्हेरेव्हचे आव्हान 6-3, 7-6 (7-5), 6-3 असे संपुष्टात आणले. शॅपोव्हॅलोव्हने प्रारंभापासून वर्चस्व राखले असले तरी दुसऱया सेटमध्ये व्हेरेव्हने जोरदार लढत देत टायब्रेकवर नेला. पण त्यातही शॅपोव्हॅलोव्हने बाजी मारली. व्हेरेव्हने एकदा चिडून रॅकेटही मोडली होती.
मोनफिल्स, बेरेटिनीची आगेकूच
फ्रान्सच्या 17 व्या मानांकित मोनफिल्सने सर्बियाच्या मिओमिर केसमानोविकवर 7-5, 7-6 (7-4), 6-3 अशी मात करीत दुसऱयांदा या स्पर्धेच्या शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. त्याची लढत मॅटेव बेरेटिनीशी होईल. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱया बेरेटिनीने स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टावर 7-5, 7-6 (7-4), 6-4 अशी मात केली. आधीच्या सामन्यात त्याने अल्काराझवर पाच सेट्सच्या मॅरेथॉन लढतीत विजय मिळविला होता. त्याने या सामन्यात 28 बिनतोड सर्व्हिस नोंदवल्या. बेरेटिनीने चारही ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंत असा पराक्रम करणारा तो दहावा टेनिसपटू बनला आहे. गेल्या वर्षी त्याने चौथ्या फेरीतून पोटदुखीमुळे माघार घेतली होती.
पेसिकोव्हा, कीजचे विजय
महिला एकेरीत प्रेंच ओपन चॅम्पियन चौथ्या मानांकित बार्बोरा क्रेसिकोव्हाने दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्कावर 6-2, 6-2 असा सहज मिळवित आगेकूच केली. तिने तिसऱयांदा या स्पर्धेच्या शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. तिची पुढील लढत अमेरिकेच्या मॅडिसन कीजशी होईल. कीजने आठव्या मानांकित पॉला बेडोसाचा 6-3, 6-1 असा धुव्वा उडविला. कीजने पहिल्या फेरीत सोफिया केनिनला पराभूत केले होते. कीजने या स्पर्धेआधी झालेल्या ऍडलेड ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे.
बार्टी, पेगुला विजयी
अग्रमानांकित ऍश्ले बार्टीने सलग चौथ्या वर्षी या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिने अमांदा ऍनिसिमोव्हाचा 6-4, 6-3 असा पराभव केला. तिची उपांत्यपूर्व लढत अमेरिकेच्याच जेसिका पेगुलाशी होईल. पेगुलाने पाचव्या मानांकित मारिया सॅकेरीला 7-6 (7-0), 6-3 असा पराभवाचा धक्का दिला.
सानिया मिर्झा-राजीव राम उपांत्यपूर्व फेरीत
भारताची सानिया मिर्झा व अमेरिकेचा राजीव राम यांनी मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठताना इलेन पेरेझ व मॅटवे मिडलकूप यांच्यावर मात केली. सानिया-राजीव यांनी दीड तासाच्या खेळात पेरेझ-मिडलकूप यांचा 7-6 (8-6), 6-4 असा पराभव केला. त्यांची पुढील लढत सॅम स्टोसुर-मॅथ्यू एब्डन किंवा जेमी फोरलिस-जेसन कुबलर यापैकी एका जोडीशी होईल. रोहन बोपण्णा व क्रोSिशियाची दारिया जुरॅक श्रीबर यांना पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने सानिया मिर्झा ही एकमेव भारतीय स्पर्धेत उरली आहे.









