माद्रिद
: स्पेनच्या राफेल नदालने माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत भाग घेणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले असल्याने तो अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी खेळणार आहे का, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत घेण्याचे निश्चित झाले असले तरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्याचे भवितव्य अद्याप अनिश्चितच आहे. न्यूयॉर्कमध्ये हार्डकोर्टवर ही स्पर्धा होणार असून 14 सप्टेंबरपासून माद्रिद ओपन क्लेकोर्ट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा आता पेंच ओपन स्पर्धेसाठी वार्मअप स्पर्धा असेल. पेंच ओपन 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नदालने माद्रिद ओपनमध्ये भाग घेण्याचे मान्य केले असल्याचे फेलिसियानो लोपेझने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या आयोजनाबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे. या संदर्भात स्पर्धा आयोजक याच आठवडय़ात निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा डॉमिनिक थिएमसह अनेक प्रमुख टेनिसपटूंनी व्यक्त केली आहे.









