पणजी / प्रतिनिधी
कोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षात कोणतेही मोठे कार्यक्रम होऊ न शकलेले पणजी शहर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या स्वागतासाठी सजून गेले आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका पणजीत यापूर्वी झाल्या त्यावेळी जसे उत्साहाचे वातावरण दिसून येत होते तसेच काहीसे वातावरण नड्डा यांच्या स्वागतासाठी निर्माण झाले आहे.
भाजपने पूर्ण शहर भाजपमय करून टाकले आहे. स्वागताचे फलक, कटआउटस्, पक्षाचे झेंडे यामुळे भाजपचा कोणतातरी मोठा कार्यक्रम पणजीत आहेत याची माहिती सर्वांना पोचली आहे.
नड्डा आज शनिवारी दुपारी गोव्यात पोहोचणार आहेत. संघटनात्मक कामाच्या निमित्ताने ते येणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांत त्यांच्या दौऱयामुळे जोश निर्माण झाला आहे. त्याच्या जोडीला पणजी शहरभर फलक झेंडे लावून बऱयापैकी वातावरण निर्मिती करण्यात भाजपला यश आले आहे.









