ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सोमवारी पहाटे सीतापूर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 36 तास नजरकैदेत ठेवल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. सीतापूर विश्रामगृहातच तात्पुरतं जेल उभारत प्रियंका गांधींना बंदीस्त करण्यात आले आहे. कलम 144 चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकोनिया येथे रविवारी शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला. या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 शेतकऱयांचा समावेश होता. या प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रविवारी रात्री लखीमपूरकडे रवाना झाल्या. मात्र, सोमवारी पहाटे पोलिसांनी त्यांना सीतापूरमधील हरगाव येथे रोखले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर कलम 144 चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले. अखेर 36 तास नजरकैदेत ठेवल्यानंतर प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना थोडय़ाच वेळात कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.









