प्रतिनिधी/ मडगाव
आपला 55 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी नग्नावस्थेत वार्का येथील समुद्रकिनाऱयावरुन पळणे आणि नंतर त्याची चित्रफीत इन्स्टाग्रामवरुन प्रसारित केल्याच्या आरोपावरुन कोलवा पोलिसांनी सुपर मॉडेल तथा कलाकार मिलींद सोमण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
मिलींद सोमण याची पत्नी अंकीता कोन्वर हिने आपला पती वार्का समुद्रकिनाऱयावर नग्नावस्थेत धावत असताना चित्रिकरण केले होते.
गोवा सुरक्षा मंचने या प्रकरणी पोलीस तक्रार केली होती. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता करुन गोव्याचे वर्णन चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप मंचने केला होता.
सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेने वागल्याच्या आरोपावरुन भारतीय दंड संहितेच्या 294 कलमाखाली (सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेने वागल्यास 3 महिने केदेची शिक्षा) तसेच यासंबंधीची चित्रफीत सोशल मिडियातून सर्वत्र केल्याप्रकरणी माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या 67 कलमाखाली कोलवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी ही माहिती दिली.
दोन दिवसापूर्वी काणकोण येथील शापोली धरणावर नग्नावस्थेतील छायाचित्रे काढून ती सोशल मिडियावर प्रसारित केल्याच्या आरापावरुन मॉडेल पूनम पांडे व तिचा पती सॅम यांना काणकोण पोलिसानी अटक केली होती. शापोली या सरकारी मालकीच्या धरणावर बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकरणी राज्य पाणी संसाधन खात्याने यासंबंधी तक्रार केली होती. या तक्रारीवर आधारुन काणकोण पोलिसानी त्यांला अटक केली होती आणि नंतर न्यायालयाने अनेक अटी घालून त्यांना जामिनावर सोडण्याचा आदेश दिला होता.









