प्रतिनिधी / बेंगळूर
नगर प्रशासन खात्यात रिक्त असणाऱया 530 पदांची भरती करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. कर्नाटक लोकसेवा आयोगामार्फत नेमणुकीची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती नगर प्रशासन आणि साखरमंत्री एम. टी. बी. नागराज यांनी दिली. विधानपरिषदेत मंगळवारी काँग्रेसचे सदस्य के. सी. कोंडय्या यांच्या प्रश्नावर मंत्री नागराज यांनी उत्तर दिले. नगर प्रशासन खात्यामध्ये सध्या 9,972 पदे रिक्त आहेत. ड श्रेणीतील रिक्त जागांवर सरकारकडून तर ब आणि क श्रेणीतील रिक्त पदांवर नगर प्रशासन संचालनालय पातळीवर नेमणुका केल्या जातील.उर्वरित जिल्हा पातळीवर बढती कोटय़ातील क श्रेणीच्या जागांवर नेमणुका करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांना देण्यात आली आहे. रिक्त पदांची भरती करण्यासाठी अर्थखात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, सध्या नेमणुकीला स्थगिती असल्याने भरती करण्यात अडसर आहे. न्यायालयाकडून निर्बंध हटविण्यात आल्यानंतर रिक्त पदांच्या नेमणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री नागराज यांनी दिली.









