प्रतिनिधी/ चिपळूण
माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीबाबत चर्चा करताना नगर अभियंत्याला धक्काबुक्की व शिविगाळ करण्याचा प्रकार चिपळूण नगर परिषदेत सोमवारी घडला. याप्रकरणी संबंधितावर शासकीय कामात अडथळा, तर काही कर्मचाऱयांवर मारहाणीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नगर परिषदेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रकार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरात राहणाऱया एका महिलेने खेंड परिसरातील एका बडय़ा व्यक्तीच्या संकुलाची माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे. याबाबतची माहिती घेण्यासाठी ही महिला मुंबईतील एका व्यक्तीसोबत सोमवारी नगर परिषदेत आली. या व्यक्तीने नगर अभियंता परेश पवार यांच्या केबिनमध्ये जाऊन या अर्जाबाबत विचारणा केली. त्यावेळी पवार यांनी हा विषय माझ्याशी संबंधित नाही असे सांगितले. यावर सदर व्यक्तीने तुमचे त्या संकुल मालकाशी वेगळे संबंध आहेत का, असा प्रश्न केला. यावर पवार यांनी कामाव्यतिरिक्त चुकीचे बोलू नका असे सांगताच या व्यक्तीने त्यांना शिविगाळ करीत धक्काबुक्की केली.
यामुळे नगर परिषदेत एकच गोंधळ उडाला. इतर अधिकारी व कर्मचाऱयांनी पवार यांच्या केबिनकडे धाव घेतली. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱयांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेद्र पोळ यांना हा प्रकार सांगण्यात आला. त्यानंतर कायदेशीर तक्रार घेण्याचे काम सुरू करण्यात आले. ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
घटनेचे चित्रिकरण, कर्मचारीही अडचणीत
या घटनेचे सुरूवातीचे चित्रिकरण संबंधित व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये केले आहे. त्यामुळे आपल्याला कर्मचाऱयांनी मारहाण केल्याचे त्याचे म्हणणे असल्याने कर्मचाऱयांवरही मारहाणीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱयांची
पोलीस स्थानकात धाव
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी पोलीस स्थानकात ढवळे व पोळ यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच अधिकारी, कर्मचाऱयांना धीर दिला. यावेळी राष्ट्रवादीच्या गटनेत्या वर्षा जागुष्टे, नगरसेवक आशिष खातू, परिमल भोसले, विजय चितळे, रसिका देवळेकर, नुपूर बाचिम आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनीही पोलीस स्थानकात येऊन ढवळे यांच्याशी चर्चा केली.









