मालवण बाजारपेठेत काही काळ वातावरण तंग : फळ विक्रीचे कारण
प्रतिनिधी / मालवण:
मालवण बाजारपेठेत सोमवारी सकाळी परजिल्हय़ातील फळ विक्री सुरू केल्यावरून नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यात वाद रंगला. सर्व लोकप्रतिनिधींच्या एकमताने परजिल्हय़ातील भाजीपाला व फळे विक्रीला बंदी घातलेली आहे. त्यामुळे परजिल्हय़ातील फळ विक्रीला नगराध्यक्षांनी आक्षेप घेत कारवाईचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. मुख्याधिकारी यांनी परवानगी दिल्याने फळ विक्री रोखता येऊ शकत नाही, अशी भूमिका उपनगराध्यक्षांनी घेतली होती. त्यामुळे बाजारपेठेत काही काळ वातावरण तंग होते.
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन परजिल्हय़ातील भाजीपाला विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बाजारपेठेत परजिल्हय़ातील भाजी आणि फळे विक्री करणाऱया व्यावसायिकांना दोन दिवसांची मुदत देऊन सर्व सामान विक्री करण्यास सुट दिलेली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने बेकायदेशीरपणे परजिल्हय़ातील भाजी विक्री होताना अनेकदा कारवाई केली होती. एकावर तर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. इतरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी परिस्थितीत असताना आज मालवण बाजारपेठेत पुन्हा एकदा फळबाजार सुरू झाला होता.
मुख्याधिकाऱयांकडून पाहणी
सकाळी नेहमीप्रमाणे फळबाजार मांडण्यात आल्यानंतर मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी टिमसमवेत बाजारपेठेत पाहणी केली होती. त्यावेळी फळांच्या गाडय़ा आहेत, त्याच ठिकाणी उभ्या होत्या. त्यांनी संबंधितांवर कारवाई केली नाही. नंतर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनीही बाजारपेठेत नेहमीप्रमाणे फेरफटका मारला. पालिकेचे आरोग्य कर्मचारीही बाजारपेठेत फिरत होते. मात्र, फळ विक्रीवर कारवाईसाठी कोणीही पुढाकार घेतला नव्हता.
नगराध्यक्षांची एन्ट्री अन् वादाला सुरुवात
नगराध्यक्षांना बाजारपेठेत फळ विक्रीच्या गाडय़ा उभ्या असल्याची माहिती मिळताच, त्यांनी कारवाईसाठी पालिकेची एक टिम घेऊन त्याठिकाणी पोहोचले. यावेळी बांधकाम सभापती यतीन खोत हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. त्यांनी फळ विक्रीला मुख्याधिकाऱयांनी शहरात फिरून विक्री करण्याचे आदेश दिल्याने एकाच जागेवर थांबून फळविक्री केली जात असल्याबद्दल कारवाई करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला दिले. नगराध्यक्षांची एन्ट्री झाल्यानंतर त्याठिकाणी उपनगराध्यक्ष राजन वराडकर व माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आले. त्यांनी नगराध्यक्षांच्या कारवाईला विरोध केला. यावेळी शाब्दिक द्वंद्व रंगले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले. भर बाजारपेठेत फळ विक्रेत्यांसमोर हा वाद रंगला होता. उपस्थित नागरिकांसमोरच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यात वाद सुरू होता.
पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार – नगराध्यक्ष
सर्वानुमते शहरात परप्रांतीय भाजीपाला व फळे विक्रीला बंदी घालण्यात आलेली असताना मुख्याधिकाऱयांनी आपल्या अधिकारात आता फळ विक्रीला परवानगी दिलेली आहे. ही विक्री एकाच जागेवर थांबून न करता शहरात फिरून करायची होती. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची सूचना मी केली होती. नियमात राहून व्यवसाय करण्यास कोणतीही बंधने नाहीत. मात्र, एकाच ठिकाणी थांबून व्यवसाय करणाऱयावर कारवाई होणारच, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. मी सूचना करूनही यावर अंमलबजावणी न झाल्याने मुख्याधिकाऱयांविरोधात पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे, असे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले.
कारवाईचे अधिकार नगराध्यक्षांना कोणी दिले?
शहरात फळ विक्रीला मुख्याधिकाऱयांनी परवानगी दिली आहे. कर्मचाऱयांना घेऊन मुख्याधिकारी स्वत: बाजारपेठेतून फिरून गेले होते. असे असताना सकाळी अकरा वाजता नगराध्यक्ष फळ विक्रेत्यांवर कारवाईसाठी उतरले होते. नगराध्यक्षांना कारवाईचे अधिकार आहेत का? असा सवाल वराडकर यांनी केला आहे. भाजी व फळ विक्रीमध्ये राजकारण करू नये. मालवणची जनता त्रासलेली आहे. यात अधिक त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाईचे अधिकार पोलीस निरीक्षक, तहसीलदार आणि मुख्याधिकाऱयांना आहेत, असे असताना नगराध्यक्ष कारवाई करण्यास का उतरले, असा सवाल वराडकर यांनी केला. पक्षाचा गैरवापर करून पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्याची भाषा नगराध्यक्षांनी करू नये, असे त्यांनी सांगितले.









