चार प्रभागांना दिल्या भेटी, आरोग्य सभापती सौ.घोरपडे यांनी दिल्या सूचना
प्रतिनिधी/ सातारा
सातारच्या प्रथम नागरिक म्हणून सातारा शहरवासीयांच्या हिताकरता काम करणे हे आद्यकर्तव्य समजून सातारच्या नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी प्रभागनिहाय पाहणी दौरा सुरू केला आहे.आपल्या पायाला भिंगरी लावत नेत्यांच्याप्रमाणे जनतेचे दुःख हे आपले दुःख, सातारची जनता सुखी तर आपण सुखी असा मंत्र अंगी बाळगत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या ज्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत त्यामध्ये काही कमी नाही ना याकरता शनिवारी ही त्यांनी चार प्रभागांना भेटी दिल्या.आरोग्य सभापती सौ.अनिता घोरपडे यांनी ही पाहणी दरम्यान सूचना दिल्या.
सातारा शहरात कोरोनाला येऊ द्यायचे नाही हा निर्धार सातारा पालिका प्रशासनाने केला आहे.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या सूचनेनुसार केलेला आराखडा ऍक्शन मोडवर सर्वच प्रभागात राबवण्यात आला.प्रत्येक प्रभागात स्वच्छता आणि स्वच्छतेला प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आले.प्रभागात नेमकेपणाने काम झाले आहे का?,आणखी काही त्रुटी नाहीत ना याकरता स्वतः नगराध्यक्ष सौ.माधवी कदम यांनी प्रत्येक प्रभागाला भेटी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.शनिवारी सकाळी त्यांनी प्रभाग क्रमांक7,8,9 व 10 मध्ये भेट दिली.त्यांच्यासमवेत आरोग्य सभापती अनिता घोरपडे या होत्या.दोघीही महिला असून त्यानी शहरात स्वच्छता राखली जावी व निर्जंतुक फवारणी कोणत्याही प्रभागात राहू नये अशा सूचना आरोग्य विभागाचे प्रमुख तथा उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना दिल्या.त्यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी नगरसेविका दिपलक्ष्मी नाईक, नगरसेवक बागवान, नगरसेविका लता पवार, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे हे उपस्थित होते.त्यांनी ही काही सूचना केल्या.
शहरातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन
सातारा शहरातील ज्या दानशूर व्यक्ती किंवा समाजसेवि संस्था यांना सध्याच्या संकट समयी सातारा शहर व परिसरातील गरजू व्यक्तींना धान्य, शिधा इत्यादी कोणत्या ना कोणत्या रूपाने मदत करायची इच्छा असेल अशा लोकांनी सातारा नगरपालिकेचे शहर अभियंता भाऊसाहेब पाटील यांचेशी संपर्क साधावा. या कामा करिता सातारा नगरपालिकेमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे..नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत करावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ.माधवी संजोग कदम यांनी केले आहे.








