मंडईतील व्यापाऱयांनी घेतली भेट : कुणाचाही व्यापार बुडणार नाही-परब, त्या बैठकीला एकही व्यापारी नव्हता!
15 सप्टेंबरनंतर प्रभागवार भाजी विक्री केंद्र बंद झाल्यानंतर मंडईतील व्यापाऱयांचा व्यापार पूर्ववत होणार आहे.-नगराध्यक्ष
प्रतिनिधी / सावंतवाडी:
संत गाडगे महाराज मंडई परिसरातील अतिक्रमणे पालिकेने हटविल्यानंतर सर्वपक्षीयांनी या कारवाईला विरोध केला होता. सर्वपक्षीयांनी भाजी विक्रेत्यांना पूर्ववत जागा द्यावी, अशी मागणी गुरुवारी पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात झालेल्या बैठकीत केली होती. नगराध्यक्ष संजू परब यांनी यासंदर्भात दोन दिवसात निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली असतानाच शुक्रवारी संत गाडगे महाराज मंडईतील व्यापाऱयांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन अतिक्रमण हटविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच नगराध्यक्षांनी निर्णयाचा पुनर्विचार करू नये, असे आवाहन केले. गुरुवारच्या बैठकीत बाजारातील कुणीही भाजी विक्रेते, फूल विक्रेते अथवा किराणा व्यापारी नव्हते. बाजाराशी ज्यांचा संबंध नाही, त्यांचा नगराध्यक्षांनी विचार करू नये, असे आवाहन केले.
नगराध्यक्ष परब यांनी व्यापाऱयांच्या मागणीचा जरुर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही देताना मी भाजप, सावंतवाडीकर यांच्यामुळे नगराध्यक्ष झालो. त्यामुळे कुणाच्याही दबावाला भिक घालणार नाही. जे योग्य असेल तेच करणार, असे स्पष्ट केले. त्यामुळे गाडगे महाराज मंडईतील वादासंदर्भात नगराध्यक्ष सर्वपक्षीय बैठकीतील आश्वासनाप्रमाणे दोन दिवसात निर्णय देणार की अन्य निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे. नगराध्यक्ष परब यांनीही गुरुवारच्या बैठकीत एकही भाजी विपेता नव्हता, असे स्पष्ट केले.
बाहेरील व्यापारी दोनच कुटुंबातील
नगराध्यक्ष परब यांनी सांगितले की, संत गाडगे महाराज मंडईतील व्यापाऱयांनी जो पाठिंबा दिला तो कधीही विसरू शकत नाही. ज्यांचा व्यापाराशी संबध नाही ते विरोध करत आहेत. गुरुवारच्या बैठकीला एकही भाजी विक्रेता नव्हता. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी होते. ज्या व्यापाऱयांनी पाठिंबा दिला त्यांच्या भविष्यात मंडई उभारताना प्रथम विचार केला जाईल. बाहेर जे व्यापार करत होते ते दोनच कुटुंबातील होते. ते सर्वांना गेली अनेक वर्षे वेठीस धरत होते. बाहेर नागरिकांना भाजीसाठी जास्त पैसे मोजावे लागत होते. मंडईत कमी मोजावे लागत होते. आत बसणाऱयांचा आतापर्यंत व्यापार होतच होता. तेही व्यापारी आहेत. आता एकत्र ग्राहकांना भाजी खरेदी करता येणार आहे. त्यामुळे मी आता दबावाला भीक घालणार नाही. 15 सप्टेंबरनंतर प्रभागवार भाजी विक्री केंद्र बंद झाल्यानंतर मंडईतील व्यापाऱयांचा व्यापार पूर्ववत होणार आहे. त्यामुळे कुणीही व्यापार होणार नाही, याची काळजी करू नये. सर्वाचे हित पाहिले जाईल, अशी ग्वाही परब यांनी दिली.
यावेळी राकेश नेवगी, अजित वारंग, विजय राणे, दयानंद राणे, बाबा बांदेकर, जॉनी डिसोझा, नासीर महम्मद शहा, जगदीश वारंग, प्रकाश निगुडकर, अजित तेली, स्वप्नील केसरकर, संतोष मिरजकर, वस्तगिर बागवान, आरिफ डोनी, उमेश निंबाळकर, महंमद गजावर मुल्ला, जुलेम महंमद मुल्ला, वनिता पाटील, शब्बीर शेख सुलेमान, मुनीर महंमद शेख, मंदार पिळणकर, विलास नाईक, आपा पानवाला, शौकद पानवाला, रफीफ शेख, गणेश चव्हाण, विनायक केसरकर, पार्वती मठकर, मनीषा सावंत, सुचिता सावंत, संगीता नार्वेकर, सुरेश नार्वेकर, आनंद मांजरेकर, दर्शना सावंत, प्रमिला शृंगारे, सुनंदा परब, देवकी जोशी, प्राजक्ता सांगेलकर, संजना म्हापसेकर, निवेदिता शृंगारे, कल्पना सावंत, प्रवीण म्हसकर हे व्यापारी तसेच पालिका आरोग्य सभापती ऍड. परिमल नाईक, आनंद नेवगी, नासीर शेख, बंटी पुरोहित, अजय गोंधावळे आदी उपस्थित होते.









