प्रतिनिधी/ चिपळूण
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी आतापर्यंत केलेल्या कामांपैकी तब्बल 19 कामांवर आक्षेप घेत त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडी लवकरच जिल्हाधिकाऱयांकडे सादर करणार आहे. सध्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांशी गटनेत्यांची याबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.
नगराध्यक्षा खेराडे यांच्यावर नजीकच्या काळात अविश्वासाचा ठराव आणण्याच्या जोरदार हालचाली महाविकास आघाडीकडून सुरू आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी शहरातील पाग परिसरातील शाळेत महाविकास आघाडीची बैठक झाली. त्यात उपस्थित नगरसेवकांनी खेराडे यांनी केलेल्या 19 कामांवर आक्षेप घेत या कामांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. असा ठराव नगरसेवक राजेश केळसकर यांनी मांडला. त्याला बिलाल पालकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभेचे अध्यक्ष सुधीर शिंदे यांनी यावर मतदान घेतल्यावर उपस्थित नगरसेवकांनी हात वर करून त्याला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे ठराव मंजूर झाला.
त्याप्रमाणे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना देण्यासाठी या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या प्रस्तावात खेराडे यांनी शहरातील भुयारी गटार योजना, एलईडी स्ट्रीट लाईट, मार्कंडी येथील भागवत घर ते पवन तलावामागील गटार, खेंड येथील संसारे घरामागील खासगी जागेत बांधलेली संरक्षक भिंत, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण कामातील अनियमितता, शौचालये कामे, रस्ते, कार्यालयीन कामांसाठी असलेल्या गाडीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी नगरपरिषदेच्या अधिनियमाला व कायद्याला बगल देत पदाचा गैरवापर करून गैरकारभार केला आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.
या प्रस्तावावर काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे, शिवसेनेचे उमेश सकपाळ, राष्ट्रवादीचे बिलाल पालकर, नगरसेवक शशिकांत मोदी, फैरोझा मोडक, राजेश केळसकर, सीमा रानडे, शिवानी पवार, स्वाती दांडेकर, मनोज शिंदे, सफा गोठे, भगवान बुरटे, सुषमा कासेकर, सुरय्या फकीर, करामत मिठागरी, सई चव्हाण, संजीवनी शिगवण, संजीवनी घेवडेकर, मोहन मिरगल यांच्या सहय़ा असण्याची शक्यता आहे. सध्या या प्रस्तावाबाबत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा सुरू असून त्यांचा सल्ला घेऊन लवकरच तो जिल्हाधिकाऱयांकडे सादर केला जाणार असल्याचे समजते.









