प्रतिनिधी/ सातारा
येथील मल्हारपेठेतल्या रस्त्यालगत लावलेल्या झाडांची तोड नगरसेवकाकडून केल्याचा प्रकार कॅमेऱयात कैद करत असताना पत्रकारासोबतच उद्धट वर्तन केल्याची घटना दि.3 रोजी सकाळी घडली. गटरच्या कामामध्ये अडथळा ठरत नसलेल्या झाडांची जेसीबीच्या सहाय्याने पालिकेच्या कर्मचाऱयांकडून नगरसेवकाने केली गेली आहे. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की शहरातील मल्हारपेठेत पत्रकार संतोष शिंदे यांनी गेल्या काही वर्षामध्ये अनेक झाडे लावलेली आहेत. त्या झाडांचे संगोपन त्यांनी केलेले आहे. असे असताना तेथील नगरसेवक बाळसाहेब खंदारे यांनी गटरचे काम हाती घेतले आहे. हे गटरचे काम करताना लावलेल्या झाडांची कोणतीही अडचण होत नव्हती. पालिका प्रशासनाकडून झाडे तोडण्याबाबत रितसर परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी परवानगी न घेता रेटून, धाक, धपटशाही वापरुन झाडे तोडण्यास सुरुवात केली. त्याबाबत पालिकेच्या अधिकाऱयांकडे विचारणा संतोष शिंदे यांनी केली होती. तशी कोणतीही झाडे तोडण्याकरीता परवानगी दिलेली नसताना पुन्हा शनिवारी सकाळी नगरसेवक बाळू खंदारे यांनी जेबीसीच्या सहाय्याने झाडे तोडण्यास सुरुवात केली.
ती झाडे तोडत असल्याबाबतचे चित्रीकरण करत असताना नगरसेवक बाळू खंदारे यांनी माझ्याशी उद्धट वर्तन करत तुला काय करायचे ते कर. मी कायदा मोडणारा माणूस आहे असे म्हणत झाडे तोडली. पालिकेच्या कर्मचाऱयांना त्यांनी या कामामध्ये वापरले. याची माहितीही मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनाही याबाबत माहिती दिली आहे. त्यावरुन त्याची चौकशी करुन झाडे तोडून पर्यावरणाची हानी करणाऱया नगरसेवकावर आणि पालिकेच्या कर्मचाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.








