आगामी वर्षांसाठी 571 कोटी 80 लाखांचा आराखडा मंजूर
नगर / प्रतिनिधी :
जिल्हा नियोजन समितीच्या आराखडय़ातील तरतूद करण्यात आलेला निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घ्या, असे स्पष्ट निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले. तसेच बैठकीत आगामी 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या 571 कोटी 80 लाख रुपयांच्या आराखडय़ास मान्यता देण्यात आली असून, नगर जिल्हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा असल्याने शासनाकडे 971 कोटी रुपयांची मागणी नियोजनासाठी केली जाईल. जिल्हय़ाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी मिळण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ठाम ग्वाही पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली.
मुश्रीफ यांच्याकडे जिह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आल्यानंतर ते प्रथमच जिल्हा दौऱयावर होते. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या वेळी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, आमदार रोहित पवार व अन्य उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, जिल्हा नियोजन योजना सन 2019-20 करिता 570 कोटी 81 लाख रुपयांच्या आराखडय़ास मंजुरी मिळाली होती. मंजूर निधीपैकी 340 कोटी 34 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. प्राप्त निधीपैकी 284 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर कामांसाठी वितरित करण्यात आला. डिसेंबरअखेर खर्च झालेला निधी 196 कोटी 36 लाख इतका आहे. डिसेंबरअखेर खर्चाचे प्रमाण 70 टक्के आहे. जिल्हा नियोजन योजनेतून जिह्यातील महत्त्वपूर्ण विकासकामांना गती दिली जाते. हे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा नियोजनच्या प्राप्त निधीपैकी शंभर टक्के निधी खर्च होणे अपेक्षित आहे, याची गांभीर्याने दखल सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी.









