फेरविचार याचिकेवरील सुनावणी लांबणीवर
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणबाबत धारवाड उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत म्हणणे मांडण्यासाठी नगरविकास खात्याने 15 दिवसांचा अवधी न्यायालयाकडे मागितला आहे. त्यामुळे न्यायालयाची सुनावणी 15 दिवसानंतर होणार आहे.
बेंगळूर न्यायालयाच्या आदेशानुसार नगरविकास खात्याने मनपा वॉर्ड आरक्षण जाहीर केले आहे. मात्र पुनर्रचना व आरक्षण नव्याने जाहीर करण्याचा आदेश धारवाड उच्च न्यायालयाने बजावला होता. या आदेशाची अंमलबजावणी नगरविकास खात्याने केली नाही. त्यामुळे माजी नगरसेवकांनी धारवाड उच्च न्यायालयात फेरविचार करण्याची याचिका दाखल केली आहे. याबाबत नोटीस बजावून गुरुवार दि. 4 रोजी न्यायालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार नगरविकास खात्याचे वकील न्यायालयात हजर झाले होते. आरक्षण आणि पुनर्रचनेबाबतच्या याचिकेंतर्गत म्हणणे मांडण्यासाठी 15 दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यामुळे ही सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. सदर याचिकेवर सुनावणी केव्हा होणार तसेच उच्च न्यायालय काय निर्णय देणार आहे. याकडे माजी नगरसेवकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.









