प्रतिनिधी/ फलटण
फलटण नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मीनगर भागातील सिटी सर्वे नंबर 6487 सेक्टर 2 च्या शासकीय खुल्या भूखंडाच्या उत्तर बाजूस प्लॉट नंबर 4 व 5 चे धारक यांनी बेकायदा बांधकाम केले आहे. फलटण नगरपरिषदेकडे संबधित नागरिकांनी वारंवार तक्रार करुनही यावर काहीही कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांच्या मूलभूत हक्काला बाधा येत असल्याने मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दिला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नगरपरिषदेकडुन अतिक्रमणावर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याच्या पार्श्वभुमीवर आता या भागातील नागरिकांनीच उपोषण करण्याचा इशारा दिला आहे
सिटी सर्वे नंबर 6487 सेक्टर 2 मधील प्लॉट नं. 4 व 5 यांनी लगतच्या दक्षिण बाजूकडे असणाच्या मंजूर रेखांकनातील खुली जागेत अतिक्रमण करून त्याचा बेकायदेशीर वापर सुरू केला आहे. याबाबत फलटण नगरपरिषद यांच्याकडे सातत्याने तक्रारी अर्ज देऊन त्याच्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे नगर परिषदेच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे. नगर परिषद मुख्याधिकारी संजय गायकवाड हे उडवाउडवीची उत्तरे देऊन दाखल तक्रार अर्ज विनाकारवाई निकाली काढत असून यामुळे शहरात अतिक्रमणे वाढत आहेत.
खुल्या भूखंडास तिन्ही बाजुने संरक्षण भिंत उभारण्यात आली असून अतिक्रमण केलेल्या बाजूनं भिंत उभारण्यात आली नसून भिंत उभारण्यात अडथळा निर्माण करणारी बेकायदा बांधकाम हटवावे अशी तक्रार यापूर्वी लेखी स्वरूपात केली होती. त्यावर मुख्याधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसून नगरपालिकेकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन तक्रार अर्ज निकाली काढला जात असून यामागे नगरपालिकेचा हेतू संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत आहे.
नगर परिषद हद्दीतील असे अनेक खुले भूखंडावर अतिक्रमणे करण्यात आली असून तक्रारी दाखल होऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नगर परिषदकडूनच एक प्रकारे अतिक्रमणे करण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एकंदरीतच जबाबदार अधिकारीच बेजबाबदारपणे वागत असल्याने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर ठिकाणी लगत असणाया एका अतिक्रमण करणाया प्लॉट धारकास नगर परिषद कडून नियमबाह्य परवानगी दिली असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या नवीन बांधकाम करणाया धारकाने याठिकाणी मागील बाजूस चालू स्थितीत नियमबाह्य बांधकाम सुरू असून यावर बांधकाम विभाग काहीही हरकत घेत नसल्याने याठिकाणी जोमात अतिक्रमण सुरु आहे.
लक्ष्मीनगर येथील सिटी सर्वे नंबर 6487 सेक्टर 2 मधील खुल्या भूखंडावर झालेले अतिक्रमण नगर परिषद यांनी न काढल्यास ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. आता प्रशासक म्हणून काम पहाणारे मुख्याधिकारी संजय गायकवाड हे खुल्या भुंखंडावर झालेले अतिक्रमण पाडून खुला भूखंड खुला करणार की दुर्लक्ष करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक वर्षांपासून नगरपालिका बांधकाम विभागात ठाण मांडून बसलेल्या व मांडवलीचा मलिदा खाऊन फुगलेल्या व काळेबेरे केलेल्या काळेबेरे नामक कर्मचायांची अन्य विभागात बदली करण्याची गरज असून फलटण शहरास भकास करण्यात मोठे योगदान असलेल्या या कर्मचायास लवकरच बांधकाम विभागापासून दूर ठेवण्यात फलटणचे हित असल्याच्या चर्चेला आता ऊत येवु लागला आहे









