८२ वर्षाच्या आजीला आता आधार नातवाचा
बोरगाव येथील घटना, आई, वडील, आजोबांचा कोरोनाने मृत्यू
सागर वाझे / बोरगाव
वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील हृदय पिळवटूणारी घटना घडली. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात आपले कर्तव्य बजावणारा बोरगावचा सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक रोहित रमेश फार्णे यांच्या कुटुंबावर कोरोनाने घाला घातला. एक, दोन नव्हे तर अख्खे कुटुंबच या कोरोनाने बाधित झाले. यामध्ये स्वतःची आई, वडील व आजोबा यांनी प्राण गमावले. ८२ वर्षाच्या आजीला आता एकमेव रोहितचा आधार उरला आहे.
गडचिरोली येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे रोहित रमेश फार्णे यांनी नक्षलवादी विरोधी अभियान पथकात तीन वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना डिसेंबर २०२० मध्ये विशेष सेवा पदक मिळाले. या शौर्याबद्दल त्यांची सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. १ मे २०२१ ला पोलिस महासंचालक पदकाचे ते मानकर ठरले.
एप्रिलच्या दरम्यान रोहितचे अख्खे घर रुग्णालयात उपचार घेत असताना २२ एप्रिल रोजी रोहितचे आजोबा रघुनाथ फार्णे यांचे कोरोनाने निधन झाले. दुसऱ्या दिवशी आई लक्ष्मी रमेश फार्णे यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या काही दिवसात म्हणजे ८ मे रोजी वडील रमेश फार्णे यांचे निधन झाले. कोरोनाने कुटुंबातील आधार उन्मळून पाडले.

फार्णे कुटुंबावर कोरोनाने एवढा जबरदस्त हल्ला केला की, डोळ्यादेखत घरातील आई, वडील व आजोबांचा मृत्यू झाला. घरी वृद्ध आजीच एकटी राहिल्याने याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भारतमातेची सेवा करत अनेक लढाया जिंकणाऱ्या या अधिकाऱ्याच्या कुटुंबाला मात्र कोरोनाने हरवलं. त्यामुळे बोरगावसह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.








