ऑनलाईन टीम / नाशिक :
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात जखमी झालेले नाशिकचे सुपुत्र आरपीएफ सहाय्यक कमांडर नितीन भालेराव यांना रविवारी सकाळी वीरमरण आले.
सुकमा जिल्ह्यातील ताडमेटलामध्ये नक्षलवाद्यांनी शनिवारी IED स्फोट घडवला. तसेच जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 10 जवान जखमी झाले होते. सहाय्यक कमांडर नितीन भालेराव यांची प्रकृती चिंताजनक होती. रात्री उशिरा त्यांना हेलिकॉप्टरने रायपूरला हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
भालेराव यांचे पार्थिव विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. त्यानंतर ते नाशिकला रवाना होईल. नाशिकमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.








