सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह बोलेरो वाहनही पळविले
बेळगाव / प्रतिनिधी
बंद असलेली घरे फोडून घरातील किमती ऐवज लांबविण्याचे सत्र सुरूच आहे. नक्षत्र कॉलनी (लक्ष्मीटेक) येथे रविवारी सकाळी असाच प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत चोरटय़ांनी घरातील तिजोरी फोडून तब्बल 15 लाख 76 हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. घरातून जाताना दारातील सुमारे 10 लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहनदेखील पळविले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून, पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. नक्षत्र कॉलनी येथील ऑस्टन जॉन यांच्या घरात चोरीचा हा प्रकार घडला. घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरटय़ांनी हा डाव साधला आहे.
ऑस्टन जॉन यांचे वडील आशिष जॉन यांना हृदयविकाराचा आजार असल्याने उपचारासाठी त्यांना दि. 1 जानेवारी रोजी मनिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यामुळे घरची सर्व मंडळी त्याच ठिकाणी होती. ही मंडळी बेळगावात आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. ऑस्टन जॉन यांनी तक्रार दिल्यानंतर कॅम्प पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटय़ांनी घरातील तिजोरीतील सोने आणि चांदीचे 21 प्रकारचे वेगवेगळे दागिने लंपास केले आहेत. त्यामध्ये सोन्याच्या बांगडय़ा, साखळय़ा, अंगठी, कर्णफुले, मंगळसूत्र, नेकलेस ब्रेसलेट, पोहेहार, पैंजण यांचा समावेश आहे. या किमती ऐवजाबरोबरच चोरटय़ांनी ऑस्टन जॉन यांच्या मालकीचे बोलेरो वाहन (क्र. केए 22 एम बी 3104) घेऊन पोबारा केला. त्यामुळे चोरीस गेलेला सर्व ऐवज आणि वाहनाची मिळून एकूण किमत 25 लाख 76 हजार 600 रुपये इतकी होते.
कॅम्प पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संतोषकुमार व सहकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.









