अध्याय बारावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, ज्यांचा भक्तिभाव सरळ शुद्ध असेल ते सरळ मला येऊन मिळतात त्याबद्दल मी तुला अनेक उदाहरणे सांगितली. मग ते भक्त पशु, पक्षी, राक्षस, मनुष्य यापैकी कोणत्याही योनीतील असोत. मला सर्वच प्रिय आहेत. गोपींचा भक्तिभाव तर सर्वश्रुतच आहे पण जे पांडित्याचा अभिमान मिरवतात ते मात्र कदापि मला येऊन मिळत नाहीत त्याबद्दल सांगतो.
एक ब्राह्मण आपल्या मोठय़ा शास्त्राभिमानाच्या बळाने आपल्या स्त्रीला माझ्याजवळ येऊ देईना. तो लोकांना म्हणे की, तुम्ही वेदशास्त्रापासून भ्रष्ट झाला आहात. गुराख्याची आणि गवळय़ांची पूजा काय म्हणून करता ? त्या स्त्रीचे मन बाकीच्या सर्व स्त्रिया जात असलेल्या पाहून माझ्यासाठी तळमळू लागले पण तो ब्राह्मण मोठा कर्मठ असून कठोर अंतःकरणाचा होता. त्याने तिला अडवून धरले. तो म्हणाला, “ तुझ्या पित्याने तुला माझ्या हातात दिली, तेव्हाच मी तुझ्या देहाचा पती झालो आहे. मला सोडून तू गवळय़ाकडे कशी जातेस ?’’ तेव्हा ती त्याला म्हणाली, “तू ह्या देहाचा पती आहेस.’’ असे म्हणून तो देह त्याच्यापुढे ठेवून ती प्राणाने येऊन मला मिळाल्यामुळे सायुज्यमुक्तीला गेली. ज्या माझ्या प्राप्तीसाठी साधक नानाप्रकारच्या कष्टांनी थकून जातात, ती साधने न करताही त्या स्त्रिया अनायासे मला पावल्या. त्यांनी वेदाध्ययन केले नव्हते की महापुरूषांची उपासना केली नव्हती. त्याचप्रमाणे त्यांनी कोणतीही व्रते किंवा तपश्चर्यासुद्धा केली नव्हती. केवळ सत्संगानेच त्या मला येऊन मिळल्या. अरे ! केवळ सत्संगतीनेच किती स्त्रिया माझ्या स्वरूपाला पावल्या त्यांची संख्या मोजता येत नाही. एकनि÷sने जे माझ्या भक्तीला लागतात, त्यांना मी श्रीकृष्ण सुलभच आहे. जे संत केवळ आत्मस्वरूपीच होते, त्यांना माझी संगती प्राप्त झाली. भावार्थाने मला येऊन मिळाल्यावर तप, व्रत, हे घेऊन काय करतोस ? माझे पद प्राप्त होण्याला त्यांच्याजवळ भावार्थ हेच भांडवल आहे. सर्व गोपी भक्तिबळानेच माझ्या पदाला पोचल्या. माझ्या मुरलीचा ध्वनि ऐकताच गोपिका सर्व कामे सोडून देऊन आपल्या देहाचा सांभाळ करण्याचेही भान न धरता मला शोधीत माझ्याजवळ आल्या. नाथमहाराज गौळणींची ही अवस्था चांगलीच जाणून आहेत. गोपिकेच्या कृष्णप्रेमाच्या अनेक गौळणी त्यांनी रचलेल्या आहेत. त्यांच्या एका प्रसिद्ध गौळणीत ते मुरलीचा आवाज ऐकून राधा गौळण कशी बावरून गेली, तिची काय अवस्था झाली याचं सुरेख वर्णन करताना म्हणतात, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ।।धृ।। नको वाजवू श्री हरी मुरली। घरी करीत होते मी कामधंदा। तेथे मी गडबडली रे ।। 1 ।। नको वाजवू श्री हरी मुरली। घागर घेवूनी पाणीयाशी जाता। डोई वर घागर पाझरली ।। 2 ।। नको वाजवू श्री हरी मुरली। एका जनार्दनी पूर्ण कृपेने। राधा गवळण बावरली ।। 3 ।।
पतीची व पित्याची आवड सोडून आणि वेदाची किंवा शास्त्राची भीड न धरता त्यांनी माझ्या ठिकाणीच अढळ भक्ती ठेवली. गोपिकांना माझे प्रेम अत्यंत प्रिय वाटत होते. एकाच घावासरशी पुत्रस्नेह तोडून विधीला पायांखाली रगडून माझ्या आवडीसाठी त्वरेने गोपिका मला पावल्या. त्याचप्रमाणे गाईही मुरलीच्या नादाने वेडावून गेल्या. त्यांच्या देहाला असणारे वाघाचे भय देखील त्या विसरल्या व माझ्या ठिकाणी लुब्ध झाल्या. माझ्या मुरलीच्या ध्वनीने मन तल्लीन झाल्यामुळे वासरे स्तनपान करण्यासही विसरली. त्यांचा तोंडातला घास तोंडातच राहिला, इतके त्यांना माझे ध्यान लागले होते. माझ्या मुरलीचा नाद ऐकल्यामुळे ज्यांनी आपापसातील वैर हृदयातून काढून टाकले, ते वाघ व ती हरिणदेखील एकमेकांच्या शरीरावर माना ठेवून मुरलीच्या नादात तल्लीन झाली. मी जे यमलार्जुन वृक्ष उपटले, ते तरले ह्यात आश्चर्य काय ! पण वृंदावनातील वृक्ष, तृण, ही देखील माझ्या साहचर्याने उद्धरली हे लक्षात ठेव. मी मोराची पिसे धारण केल्यामुळे त्या मोरपिसांच्या योगाने मोरही तरले. वृंदावनात असणारे लहान वृक्ष, वेली, गवत, पाषाण, इत्यादि जड व मूढ यांचाही माझ्या सान्नीध्याने उद्धार झाला. माझ्या संगतीत अनन्य प्रीति असणे, तीच त्यांची शुद्ध भक्ती होय.
क्रमशः







