नव इंग्रजी वर्ष सुरू झाले म्हणेपर्यंत 26 जानेवारी आला आणि जानेवारी संपेपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्पाचे नगारे वाजू लागले आहेत. राजकीय घडामोडी,आरोप-प्रत्यारोप, राजकीय भरती-ओहोटी सुरूच आहे. मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार अनावरण झाले. त्यावेळी राज्यातील सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर दिसले. महाराष्ट्रात असे चित्र दिसत असताना तिकडे बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या सर्वपक्षीय सरकारी कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा ऐकून संताप व्यक्त केला आणि सरकारी कार्यक्रमात बोलावून आपला अपमान केला असे म्हणत भाषण केले नाही. देशभर लसीकरणाला वेग आला आहे. तथापि, जनसामान्यांचे जीणे शेअर मार्केटचा सेन्सेक्स 50 हजार पार झाला तरी सुकर झालेले नाही. सांगली जिह्यात एका निवृत्त पोलिसाने शेअर बाजारात कर्जबाजारी झाल्याने बायका-मुलांसह आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. एकूणच ज्या घडामोडी जे राजकारण आणि आंदोलन होते आहे त्यांचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणसाचे हित हा असला पाहिजे पण तो दुर्लक्षिला जातो आहे आणि राजकारण, कुरघोडय़ा, शह-कटशाह आणि आर्थिक व्यवहार यांनाच महत्त्व आले आहे. मुंबईत शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. त्याला उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, बाळासो थोरात, छगन भुजबळ, राज ठाकरे असे दिग्गज एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. गर्दी होती. पुतळय़ाचे शानदार उद्घाटन झाले. शिल्पकाराचा सत्कार झाला. मुख्यमंत्र्यांनी आजचा दिवस आणि कार्यक्रम अविस्मरणीय आहे असे म्हटले आणि ते खरे होते. एखाद्याच्या मुलाने राज्याच्या सर्वोच्चपदी विराजमान होऊन दिवंगत वडिलांच्या पुतळ्याचे अनावरण करावे आणि त्या आनंदात सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपल्या राजकीय वहाणा बाहेर ठेवून सहभागी व्हावे यासारखा आनंदाचा अविस्मरणीय प्रसंग असू शकत नाही. हा बाळासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा करिष्मा म्हणावा लागेल. महायुती झाली नसती तर या कार्यक्रमाला पंतप्रधानही आले असते आणि बाळासाहेबांच्या बायोग्राफी पुस्तकांच्या प्रकाशनाला जसे देशभरातील दिग्गज एका व्यासपीठावर दिसले तसा राष्ट्रीय सोहळाही दिसला असता पण ती गोष्ट आता मागे पडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत घेतलेली नरेंद्र मोदींची भेट आणि पुतळा अनावरणास देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती यांचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. राष्ट्रवादीतही जयंत पाटील यांच्यापासून अनेकांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छा-आकांक्षांना धुमारे फुटू लागले आहेत. तिकडे बंगालमध्ये ममतादीदी अस्वस्थ आहेत. दीदींची खुर्ची हिसकावून घेण्यासाठी भाजपाने फिल्डींग लावली आहे आणि अमित शहा यांनी दमदार पावले टाकायला सुरुवात केली आहे. राजकारणात दिसते तसे असते असे नाही आणि दिसत नसले म्हणून नसतेच असेही नाही. सध्या कुठेही राजकीय महाभरती वगैरे विषय ऐरणीवर नाही पण सातारच्या शशिकांत शिंदे यांनी भाजपाने आपणास शंभर कोटी व मंत्रीपदाची ऑफर दिली होती असे सांगून खळबळ माजवली आहे. खरे तर ही ऑफर दिली असलीच तरी त्याला बराच काळ उलटला आहे. शिंदे यांनी आजच त्याची वाच्यता का केली त्यामागे काही शिजते आहे का हे तपासले पाहिजे आणि राजकारण हे समाजकारण न उरता कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे मनीमेकिंग केंद्र बनले आहे, याचीही दखल जनसामान्यांनी घेतली पाहिजे. कोरोनाची भारतीय लस प्रभावी ठरते आहे. लवकरच कोरोनामुक्त भारत असे चित्र दिसेल पण प्रजासत्ताकदिन साजरा करताना गांधीजींच्या स्वप्नातला भारत आणि शेवटचा माणूस उद्याच्या गती-प्रगतीत कोठे असणार या सवालाला निश्चित उत्तर मिळत नाही. शेअर मार्केटचा सेन्सेक्स 50 हजार पार झाला म्हणून फुगे उडवणाऱया मंडळींना सोनेही 50 हजार तोळ्यावर गेले आणि पेट्रोलचा दर लिटरला 100 रु.कडे सरकतो आहे याचा विसर आहे. अनेक लोक, युवक-युवती बेरोजगार झाले आहेत. अनेकांचे स्थलांतर झाले आहे. छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय अडचणीत आले आहेत. रोजी रोटीचे प्रश्न तीव्र आहेत. अनेक आस्थापना कामगारांना अर्ध्या पगारावर राबवून घेत आहेत. याचेही राजकारण साधू पाहणाऱयांना भान उरलेले नाही. आता अनलॉक होतो आहे. अमेरिकेत सत्ताबदल झाला आहे या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिन साजरा करताना आणि येणारे केंद्रीय बजेट सादर करताना लहान माणूस, त्याचा रोजगार, त्याचा उद्योग, ग्रामीण भारताची बळकटी, महिला व युवक सक्षमीकरण यावर भर दिला पाहिजे. अजूनही केंद्रीय कृषी कायदे हा विषय संपलेला नाही. प्रजासत्ताक दिनी कम्युनिस्टांच्या शेतकरी संघटना जोर लावून रस्त्यावर उतरणार, प्रदर्शन करणार असे दिसते आहे. ओबीसी नाराज आहेत. त्यांचेही मोर्चे निघत आहेत आणि त्याच जोडीला राममंदिर उभारणीची धून वाजते आहे. निधी संकलनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. एकूणच सारेच सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलताना दिसत आहे. अशावेळी खरे रामराज्य, ग्रामराज्य अवतरायचे असेल, शेवटचा माणूस सुखी करायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून सामान्य माणसाला केंद्रबिंदू केले पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी व राखण्यासाठी निरनिराळे उद्योग होतच राहणार. शंभर कोटी हे नवे दरपत्रक जुने होणार. घोषणा, आरोप-प्रत्यारोप, मोर्चे सुरू राहणार. आपण आपल्या व देशाच्या प्रगतीला प्राधान्य द्यायला हवे.
Previous Articleबेछूट आणि बेलगाम
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने महिलेचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.