वार्ताहर / निपाणी :
उसतोड मिळवणे म्हणजे कारखाना पदाधिकाऱयांसह ऊस वाहतूकदार, फिल्डमन, मजूर यांची मनधरणी शेतकऱयांच्या पाचवीला पुजलेली. पण यंदा दुष्काळजन्य परिस्थिती. यानंतर झालेली अतिवृष्टी, महापूर यातून उत्पादनात झालेली घट या सर्वाचा सकारात्मक परिणाम म्हणून शेतकऱयांना ऊसतोडीसाठी अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे. नको एंट्री, नको खुशाली, फक्त ऊस दाखवा, तोड देतो. वाहनांची आवश्यक ती सोय करतो. अशा विनवण्या शेतकऱयाकडे सध्या केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे सर्वाधिक भाव देण्याची ग्वाही देखील दिली जात आहे.
निपाणी शहर परिसरातील ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. परिसरातील स्थानिक कारखान्यासह महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ऊस पाठवला जातो. बारमाही पाण्याची झालेली सोय आणि शेतकऱयांनी तंबाखूकडे फिरवलेली पाठ याचा परिणाम होताना ऊस उत्पादनात कमालीची वाढ झालेली आहे. उत्पादन क्षेत्र वाढल्याने कारखानदारांना अच्छे दिन आले होते. ऊसतोड मजूर, वाहतूकदार आणि फिल्डमन वाढलेल्या ऊस उत्पादनाचा फायदा उठवत शेतकऱयांना तोड देण्यासाठी एंट्री, खुशाली यातून आर्थिक लूट करत होता. एकीकडे कारखानदारांकडून उसाला मिळणारा कमी भाव आणि दुसरीकडे खुशाली, एंट्रीच्या नावाखाली होणारी लूट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला होता. यामुळे ऊस उत्पादन नको असेच म्हणण्याची वेळ शेतकऱयांवर आली होती.
चांगल्या दराची घोषणा
गतवषी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱयांवर आली. विहिरी, कूपनलिका आणि नद्या यांची पाणीपातळी घटल्याने ऊस पीक वाळून जाताना उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. यानंतर पावसाला सुरुवात झाली, पण झालेली अतिवृष्टी व आलेला महापूर यातून ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक दिवस ऊस पीक पाण्याखाली राहिल्याने उत्पादनात मोठी घट आली. उत्पादन घटल्याचा परिणाम यंदाच्या गळीत हंगामात होणार हे कारखानदारांनी आपसूक ओळखले. म्हणूनच कोणत्याही आंदोलनाशिवाय चांगल्या दराची घोषणा करून शेतकऱयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.









