देशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक
ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशातील महिलांच्या संख्येबाबत दिलासादायक आणि चांगली बातमी समोर आली आहे. देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली आहे. आता प्रत्येक १००० पुरुषांमागे १,०२० स्त्रिया आहेत. त्याचबरोबर हा विक्रमही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाला आहे ज्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या १००० च्या वर गेली आहे. आणखी एक चांगली बातमी म्हणजे जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर देखील सुधारले आहे. २०१५-१६ मध्ये, १००० मुलांमागे ९१९ मुली होत्या, ज्या २०१९-२१ मध्ये १००० मुलांमागे ९२९ मुली झाल्या आहेत.
देशात अनेक वर्षांपासून पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण हे कमीच होते. आतापर्यंत १ हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण कमीच राहिले आहे. पण आता पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण वाढले आहे. या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झालं की, आता भारतात महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. यापूर्वी परिस्थिती काहीशी वेगळी होती, 1990 मध्ये दर 1000 पुरुषांमागे फक्त 927 महिला होत्या. 2005-06 मध्ये झालेल्या तिसऱ्या NHFS सर्वेक्षणात 1000-1000 ची बरोबरी झाली. त्यानंतर 2015-16 मध्ये चौथ्या सर्वेक्षणात ही आकडेवारी पुन्हा घसरली. 1000 पुरुषांच्या तुलनेत 991 महिला होत्या. पण आता पहिल्यांदाच महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त झाले आहे.