विमानासोबत सूर्याचे एक दुर्लभ छायाचित्र
अमेरिकेच्या छायाचित्रकाराच्या कामगिरीची जगभरात चर्चा
कॅलिफोर्नियाचे छायाचित्रकार ऍन्ड्रय़ू मॅक्कार्थी यांनी विमानासोबत सूर्याचे एक दुर्लभ छायाचित्र काढले आहे. ऍन्ड्रय़ू हायड्रोजन अल्फा सोलर फिल्टर असलेल्या दुर्बीणीतून सूर्याच्या बर्हिगत आवरणाची छायाचित्रे काढत असताना एक विमान तेथून गेले. हे दृश्य टिपण्यासाठी काही सेकंदांचाच वेळ होता, पण वेळीत ऍन्ड्रय़ू यांनी ते कॅमेऱयात कैद केले आहे. जगभरात या छायाचित्राची चर्चा असून समाजमाध्यमांवरही ते मोठय़ा प्रमाणावर प्रसारित होत आहे.
2 वर्षांपासून सूर्याचे छायाचित्रण

तो क्षण अत्यंत दुर्लभ होता. अनेक छायाचित्रकार अशाप्रकारचे छायाचित्र काढण्यासाठी विमानतळानजीक उभे असतात. मी मात्र विमानतळानजीक नव्हतो. मागील 2 वर्षांपासून सूर्याची छायाचित्रे काढत असलो तरीही माझ्यासोबत असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचे ऍन्ड्रय़ू यांनी सांगितले आहे. सूर्य आणि विमानाचे हे सुंदर छायाचित्र हायड्रोजन अल्फा सोलर फिल्टरच्या मदतीने काढण्यात आले आहे.
हायड्रोजन अल्फा सोलर फिल्टर
हायड्रोजन अल्फा सोलर फिल्टरच्या मदतीने छायाचित्रणावेळी सूर्यकिरणांना दूर करता येते आणि केवळ लाल रंगातील किरणेच दिसतात. अशाप्रकारे एक सुंदर छायाचित्र प्राप्त होत असते. हे छायाचित्र अचानक काढण्यात आल्याने ते पसंतीचे ठरले आहे. सूर्याची हजारो छायाचित्रे काढल्यावर एखादे परिपूर्ण छायाचित्र प्राप्त होते असे ऍन्ड्रय़ू सांगतात.
चंद्राचे सर्वात स्पष्ट छायाचित्र
ऍन्ड्रय़ू यांनी यापूर्वी चंद्राचे छायाचित्र काढले होते. हे जगातील चंद्राचे सर्वात स्पष्ट छायचित्र ठरले होते. त्यांनी हे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करत याला ‘ऑल टर्मिनेटर’ अशी पुस्ती जोडली होती. ऍन्ड्रय़ू यांनी या मास्टरपीसकरता चंद्राच्या हजारो छायाचित्रांना एकत्र जोडले होते. चंद्राचा प्रकाश वाढत जातो, तेव्हा त्यांनी ही छायाचित्रे काढली होती. उत्तम प्रकाश आणि योग्य स्थानामुळे चंद्राचे अशाप्रकारचे छायाचित्र प्राप्त होऊ शकले हेते.









