ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशमधील इंदूर आणि जबलपूरमध्ये नकली ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन घेऊनही 90 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसातील संसर्ग बरा झाल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने मध्यप्रदेश पोलिसांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातल्यानंतर ऑक्सिजनसह कोरोना उपचारात वापरल्या जाणाऱ्या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली. परिणामी त्याचा काळाबाजार वाढला आणि नकली इंजेक्शनही बाजारात आली. मात्र, नकली इंजेक्शन घेऊनही मध्यप्रदेशमधील इंदूर आणि जबलपूरमधील 90 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
गुजरातमधील नकली इंजेक्शनमध्ये ग्लुकोज आणि मिठाचे पाणी होते. हे इंजेक्शन घेऊनही इंदूरमध्ये 100 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर 10 जण दगावले आहेत.









