प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे राज्य परिहवन महामंडळाला मोठय़ा प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे. मागील नऊ महिन्यांमध्ये परिवहन महामंडळाला एकूण 500 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. यापूर्वी केएसआरटीच्या 8,250 बसेसमधून दररोज सरासरी 13 लाख जण प्रवास करत होते. आता 5,200 बसेस सोडण्यात आले असून 13 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यातून केवळ 4 कोटी 85 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
सध्याच्या परिस्थितीतही नागरिकांचा बसप्रवासाला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. केवळ डिझेलचा खर्च भागेल इतकेच उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे परिवहन कर्मचाऱयांच्या वेतनासाठी सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे. केएसआरटीसीच्या ईशान्य रस्ते परिवहन निगमला सर्वाधिक फटका बसला आहे. ईशान्य परिवहनच्या 40 टक्क्यांहून अधिक बसेस ग्रामीण भागासाठी सोडल्या जात आहेत. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील लोक बसमधून प्रवास करणे टाळत आहेत.
वायव्य परिवहन निगमच्या बसेसमधून प्रवास करणाऱयांपैकी 60 टक्के प्रवाशांनी बसप्रवास करणे टाळले आहे. यापूर्वी वायव्य परिवहनच्या 4,664 बसेस धावत होत्या. तर 16 लाख 50 हजार जण प्रवास करत होते. त्यामुळे दररोज 5 कोटी 40 लाख रुपयांप्रमाणे वर्षाला 1,971 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. आता केवळ 7 लाख जण प्रवास करत असून केवळ 2 कोटी 70 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.









