ऑनलाईन टीम / नंदुरबार :
नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले. तर 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकल ट्रॅव्हल्स ही खासगी प्रवासी बस जळगावहून सुरतच्या दिशेने प्रवास करत होती. बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. पहाटे तीनच्या सुमारास चालकाच्या नजरचुकीने ही बस कोंडाईबारी घाटातील दरीत कोसळली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात केली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून, 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.








