1500 एकरातील शेतीला धोका
प्रतिनिधी / खानापूर
नंदगड गावाजवळील डॅमच्या उजव्या व डाव्या कालव्यांचा सुरुवातीचाच भाग निकामी झाल्याने डॅमचे पाणी पुढे जाऊच शकत नाही. यामुळे सदर डॅमच्या कार्यक्षेत्रात येणाऱया 1500 एकर शेतीला धोका निर्माण झाला असून त्या दोन्ही कालव्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप पसरला आहे.
तालुक्याचे पहिले आमदार कै. बसापाण्णा अरगांवी यांनी तट्टीनाला व सभोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीचा लाभ उठवत नंदगड डॅमची उभारणी केली होती. त्यावेळी उजवा व डावा असे दोन कालवे तयार करण्यात आले. या दोन्ही कालव्यांचे पाणी जवळपास 4 कि. मी. परिसरातील शेतीवाडीला पोहचते. यामुळे कसबा नंदगड, चन्नेवाडी, सागरे, नंजिनकोडल, भुत्तेवाडी आदी परिसरातील शेतकऱयांना त्याचा लाभ होतो. पण गेल्या काही दिवसात त्या डॅमच्या दोन्ही कालव्यांचा सुरुवातीचा काही भाग पूर्णपणे निकामी झाला आहे. यामुळे कालव्यांतून पाणी पुढे जाण्यास कोणताच वाव नाही. त्या कालव्यांची दुरुस्ती करावी, अशी संबंधित शेतकऱयांनी अनेक वेळा मागणी केली.
अखेर दोन वर्षांपूर्वी सदर कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटीचा निधी मंजूरही झाला. पण त्याचे अद्याप कामच सुरू झाले नाही. यामुळे त्या 1 कोटी निधीचे नेमके काय झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर डॅमचे व्यवस्थापन मायनर इरिगेशन विभागाकडे आहे. त्या विभागाच्या अधिकाऱयांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. कालवे दुरुस्तीसाठी 1 कोटी रु.चा निधी मंजूर होऊनही त्याचे अद्याप काम का सुरू होत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याची मायनर इरिगेशन खात्याने दखल घेऊन त्या दोन्ही कालव्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.









