ग्रा. पं. चा उपक्रम : तीन ठिकाणी फिरते कॅमेरे : गैरकृत्यांना बसणार चाप : सोलार दिव्यांसह शुद्ध पाणीपुरवठा योजना मंजूर
वार्ताहर / खानापूर
वाढत्या चोऱया व बेकायदेशीर व्यवसायांवर नजर ठेवण्यासाठी नंदगड ग्रा.पं.ने गावच्या 9 प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. याचे नियोजन ग्रा.पं.मधून करण्यात येणार आहे. ग्रा.पं. अध्यक्ष, पीडीओ तसेच पोलीस स्टेशनमधून यावर नजर ठेवली जाणार आहे. यासाठी ग्रा.पं.ने 2 लाख 67 हजार रुपये खर्च केले आहेत.
नंदगड हे परिसरातील प्रमुख बाजारपेठ असलेले व दळणवळणाने गजबजलेले ठिकाण आहे. दर बुधवारी या ठिकाणी मोठा आठवडी बाजार भरतो. नंदगड येथे पोलीस स्थानक आहे.
नंदगड ग्रा.पं.ने 66 प्रमुख तसेच विस्तारित गल्ल्यांना जोडणाऱया रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यानुसार आंबेडकर गार्डन सर्कल, छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, पोलीस स्टेशन संगोळ्ळी रायण्णा पुतळा चौक, बाजारपेठ तसेच महात्मा गांधी पदवीपूर्व कॉलेजच्या कत्रीवर तसेच ग्रामपंचायतनजीक मुख्य रस्त्यावर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
सीसीटीव्हीमुळे पोलीस अधिकाऱयांना रहदारी नियोजन अथवा तपास यंत्रणेच्या कामात लाभदायक ठरणार आहे.
सोलार पथदीपची योजना
नंदगड व परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. रात्री पथदीप सुरू राहण्यासाठी ते सोलारच्या माध्यमातून जोडले आहेत. यासाठी ग्रा. पं. निधीतून 15 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. नंदगडमधील 66 गल्ल्यांतील प्रमुख ठिकाणी हे सोलार पथदीप बसविण्यात येणार आहेत. येत्या आठवडाभरात या कामाची पूर्तता होणार असल्याचे ग्रा.पं. अध्यक्ष विद्या मादार यांनी
सांगितले.
बाजारपेठेत एकेरी पार्किंग नंदगड येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. त्यामुळे प्रमुख बाजारपेठेत वारंवार रहदारीला अडथळा होण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे बाजारपेठेत आता एकेरी पार्किंग करण्याचा निर्णय ग्रा.पं.ने घेतला आहे. नंदगड पोलीस स्थानकाला नियोजन करण्याची जबाबदारी ग्रा.पं.ने दिली आहे.









