लॉकडाऊन उठतोय हे अजूनही खरे वाटत नाही. थोडे शैथिल्य आले आहे खरे. लहानपणी वर्गात खूप दंगा चालू असला की एखादे मारकुटे मास्तर येत आणि दिसेल त्याला छडीने चोपत. काही वेळ शांतता पसरायची. मग जरा वेळाने पुन्हा कोणीतरी हळूच खोडय़ा सुरू करी. शेवटी मारकुटे मास्तरदेखील कंटाळून जात. सरकारचे तसे काहीसे… मारकुटय़ा मास्तरप्रमाणे झाले आहे की काय अशी शंका येते.
पण ते काही असो, आमच्या देखील थकलेल्या मनांनी लॉकडाऊननंतरच्या जुन्या आयुष्याची स्वप्ने बघायला सुरुवात केली आहे. टीव्हीवर पुन्हा त्या कौटुंबिक मालिका सुरू होतील. सासू आणि सुनांची आचरट कारस्थाने, दिवसभर घरात, स्वयंपाकघरात भरजरी शालू नेसून वावरणाऱया महिला, त्यांची भांडणे, उंची कुर्ते-पायजमे परिधान केलेले मेषपात्रवत पुरुष दिसण्याचा काळ आता दूर राहिला नाही.
वृत्तवाहिन्यांना कोरोनाच्या नावाखाली सतत हिरवा काटेरी चेंडू दाखवण्याचा कंटाळा आला असेल. आता त्या वाहिन्या दुसऱया पोरकट बातम्या दाखवू शकतील. म्हणजे एखाद्या सेलेब्रिटीच्या घरातल्या अर्भकाच्या किंवा कुत्र्याच्या लीला, एखाद्या चमत्कारी बाबाच्या हकिकती वगैरे. खरोखरच दुर्घटना घडली असेल तर तीच तीच वाक्मये शब्दांची उलटसुलट रचना करून ऐकायचा आनंद मिळेल. “आपले प्रतिनिधी अमुक तिथून अपडेट देत आहेत’’, “काय सांगशील प्रमदा?’’, “तिथे काय परिस्थिती आहे?’’, “आपला संपर्क तुटला आहे, पण आपण वेळोवेळी अपडेट्स घेत राहू’’, वगैरे वाक्मये नव्या जोमाने ऐकू. वृत्तनिवेदकांना आणि संपादकांना अशुद्ध भाषेत बोलताना बघू, मराठी भाषेचा खून करताना पाहू आणि वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्रे लिहून आपला राग शांत करू. काही वाहिन्या वेळ घालवण्यासाठी भारताचे नेपाळशी, पाकिस्तानशी किंवा चीनशी युद्ध झाले तर काय होऊ शकेल याचे नेहमी वार्तांकन करतात. ती वार्तांकने पुन्हा दिसू लागतील. त्या वाहिन्यांवर पाहुणे म्हणून आलेले निवृत्त सेनाधिकारी आपल्या सैन्याची काय तयारी चालली आहे याच्या गुप्त वार्ता सांगतील. त्यांचा आपण आनंद घेऊ. रात्रीच्या वेळी काही वाहिन्या पृथ्वीवर लघुग्रह येऊन कसा आदळू शकेल, परग्रहावरून एलियन्स येऊन काय करतील याच्या हकिकती सांगतील. त्या देखील पाहू.
चला पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.








