वाहने अडवल्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज : सदस्य पळवापळवीचे कारण : नाटय़मय घडामोडीनंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची घोषणा
वार्ताहर / नंदगड
ग्रामपंचायत सदस्य पळवापळवीच्या कारणावरून ग्रामपंचायत अध्यक्ष निवडणुकीवेळी दोन गटात झालेल्या वादावादीतून पोलिसांनी नागरिकांवर लाठीहल्ला करण्याचा प्रकार नंजिनकोडल (ता. खानापूर) येथे बुधवारी घडला. त्यामुळे परिसरात जवळपास तासभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
नंजिनकोडल ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत सागरे, नंजिनकोडल, गुंडपी, कुणकीकोप, हाळझुंजवाड, दोड्डेबैल, आदी गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीचे एकूण सदस्य संख्या 7 आहे. या सात सदस्यांमध्ये दोन गट निर्माण झाले होते. हाळझुंजवाड येथील सदस्यांच्या गटाकडे प्रारंभी चार सदस्य तर विरोधी सागरे येथील गटाकडे तीन ग्रामपंचायत सदस्य होते. काही दिवसांपूर्वी सागरे गटाकडून हाळझुंजवाड गटाच्या दोड्डेबैल येथील ग्रामपंचायत सदस्याला आपल्या गटाकडे ओढण्यात आले होते. त्यामुळे सागरे गटाची सदस्य संख्या चार झाली होती. त्यामुळे सागरे गटाचा विजय निश्चित झाला होता. आपल्या गटाचा एक सदस्य घेऊन गेल्यामुळे हाळझुंजवाड गटातील सदस्य व संबंधित गावच्या लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे त्या गावातील लोक सकाळपासून नंजिनकोडल ग्रामपंचायत परिसरात दबा धरून बसले होते. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी सागरे गटातील सदस्य महाराष्ट्र पासिंग असलेल्या अनेक वाहनांतून ग्रामपंचायत कार्यालयाकडे येऊ लागले. दरम्यान, दबा धरून बसलेल्या हाळझुंजवाड गटातील लोकांनी ती वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या ठिकाणी गोंधळ माजला. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आलेले पोलीस गोंधळ शात करण्यासाठी धावून आले. आपण ग्रामपंचायत कार्यालयासमोर नियोजित अंतरावर घालून दिलेल्या रेषेच्या बाहेर वाहने अडवत आहोत. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला दमदाटी करू नये, असे त्या लोकांनी सुनावले. परंतु पोलिसांनी कोणाचेही न ऐकता गाडी अडवल्यावर लाठीहल्ला केला. अनेक गाडय़ांमधून तोंडावर रुमाल बांधून महिला ग्रामपंचायत कार्यालयाकडे येत असल्याने त्या गटात गेलेली महिला कोण, याची जाणीव वाहने अडवणाऱयांना झाली नाही. शिवाय पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाहनातून आलेले ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात गेले. त्यानंतर रीतसर अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्या निवडणुकीत सागरे गटाचा अध्यक्ष झाला. परंतु या निवडणुकीमुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर गोंधळ वाढल्याने लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील
नंजिनकोडल ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ज्ञानेश्वर यल्लाप्पा पाटील (सागरे) विरुद्ध ज्ञानेश्वर रामचंद्र लाड (हाळझुंजवाड) यांच्यात निवडणूक लागली. त्यामध्ये ज्ञानेश्वर पाटील यांना चार मते तर ज्ञानेश्वर लाड यांना तीन मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱयांनी ज्ञानेश्वर पाटील यांना विजयी घोषित केले. अध्यक्षपद सामान्यसाठी होते. उपाध्यक्ष पद अ वर्ग महिलेसाठी असल्याने जयश्री महेंद्र शेंदोळकर यांची बिनविरोध निवड झाली.









