शिवप्रतिष्ठानच्या मागणीला आले यश
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहराचा महत्त्वाचा भाग असणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथील मूर्ती परिसराचे सुशोभिकरण सुरू आहे. मध्यंतरी हे काम रखडले होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱयांनी महानगरपालिका तसेच बुडा अधिकाऱयांना काम संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आणून देताच या सुशोभिकरणाच्या कामाला गती मिळाली. शिवप्रतिष्ठानने आवाज उठविल्यामुळे हे सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मागील साडेतीन वर्षांपासून धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती परिसराचा विकास केला जात होता. सुरुवातीला महानगरपालिकेकडून 11 लाख रुपये खर्चून विकास करण्यात आला. त्यानंतर निधीची कमतरता भासत असल्यामुळे बुडाच्या निधीमधून कामाला सुरुवात झाली. परंतु मध्यंतरी काही निधी वापराविना परत गेल्याने कंत्राटदाराने कामाची गती कमी केली होती. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱया या चौकात वर्षानुवर्षे काम सुरू असल्याने शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत होती.
शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे व त्यांच्या सहकाऱयांनी धिम्यागतीने सुरू असणाऱया कामकाजाविरोधात आवाज उठविला. महानगरपालिकेचे आयुक्त रुदेश घाळी यांची भेट घेऊन त्यांना हा विषय सांगण्यात आला. महानगरपालिकेने 11 लाख रुपये खर्च केले असून, उर्वरित खर्च बुडाच्या निधीतून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पदाधिकाऱयांनी बुडाचे चेअरमन संजय बेळगावकर यांची भेट घेऊन काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. त्यांनी संबंधित कंत्राटदार व बुडाच्या अभियंत्यांना बोलावून काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कामाची गती वाढली आहे.
निवेदनाची दखल घेतल्याने कामाची गती वाढली
सध्या बलिदान मासाचे पालन केले जात असल्याने दररोज शेकडो शिवभक्त पूजन करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौक येथे येत आहेत. परंतु येथे येणाऱया शिवभक्तांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हे अर्धवट स्थितीतील काम लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही बुडा व मनपाला निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेत कामाची गती वाढविण्यात आली आहे.
-किरण गावडे (जिल्हाध्यक्ष – शिवप्रतिष्ठान)