शिवप्रतिष्ठानच्यावतीने बुडाकडे मागणी : बुडा चेअरमन बेळगावकर याच्यांकडून काम पूर्ण करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
धर्मवीर संभाजी चौक येथील धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती परिसराचे सुशोभिकरण केले जात आहे. परंतु तीन वर्षे उलटली तरी अद्याप हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. यामुळे शिवभक्तांची गैरसोय होत असल्याची तक्रार शिवप्रतिष्ठानने बुडा चेअरमन संजय बेळगावकर यांच्याकडे मांडली. त्यांनी तात्काळ संबंधित इंजिनिअर व कंत्राटदाराला बोलावून काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
सुशोभिकरणाचे काम महानगरपालिकेकडून करण्यात आले होते. परंतु ते पाडून नव्याने सुशोभिकरण करण्याच्या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. मध्यंतरी कोरोनामुळे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. सध्यादेखील अत्यंत धिम्यागतीने सुशोभिकरणाचे काम करण्यात येत आहे. काम वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे त्याचा फटका शिवभक्तांना बसत आहे. दररोज शेकडो धारकरी येथे येऊन संभाजी बलिदान मासानिमित्त पूजन करीत आहेत. त्यांना या कामाची अडचण होत आहे. त्यामुळे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी शिवप्रतिष्ठानने बेळगावकर यांच्याकडे केली.
संजय बेळगावकर यांनी संबंधित कंत्राटदार व इंजिनिअरला बोलावून काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. कंत्राटदाराने आपल्याला येत असलेल्या समस्या मांडल्या. या सर्व समस्या दूर केल्या जातील, असे आश्वासन बेळगावकर यांनी दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख किरण गावडे, शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील, शंकर भातकांडे, सागर उरणकर, नारायण सावंत, नितीन कुलकर्णी, किरण बडवाण्णाचे, अर्जुन शिंदे यांच्यासह इतर उपस्थित होते.









