संगीत या विषयाशी अगदी पहिलीच ओळख झाली ती ‘नाद’ आणि ‘ध्वनी’ यांच्या व्याख्येने. संगीताला उपयुक्त असणारा ध्वनि म्हणजेच नाद, अशी छापील व्याख्या पाठ करून झाली. पण संगीताला उपयुक्त ध्वनि असे असून असून किती असणार? तर येऊन जाऊन सात स्वर. त्यातही चार कोमल आणि एक तीव्र धरून अवघे बारा स्वर! या अवघ्या बारा स्वरांत गाण्याची अख्खी दुनिया सामावली आहे. आणि तिच्यात अनेकांचे विश्व सामावलेले असते ते निराळे. या ‘नादा’चे रूपांतर गाण्यात होते आणि ते सर्वांनाच नादावून सोडते. आणि जर का त्या स्वरांचा योग्य तो मेळ जमलाच नाही तर मग तो होतो नुसताच गोंधळ नि गोंगाट! मग नादात ब्रह्म कसे उतरायचे ते? प्रश्न विचार करण्यासारखा आहे. पण सध्या तरी आपण एकेक कडी शोधत जाऊ आणि ती जोडत जाऊ. आवाज किंवा ध्वनि असंख्य प्रकारचे असतात. अगदी घरातल्या भांडय़ांचा आवाज ते दूरवरच्या सुरुंगाच्या आवाजापर्यंत. पण हे आवाज संगीतोपयोगीही असतात हे कसे काय शक्मय आहे? तर त्यासाठी आपल्याला खूप मागेपर्यंत जावे लागेल. ‘कुंकू’ या व्ही. शांताराम यांच्या त्या वेळच्या सुप्रसिद्ध चित्रपटात
भारती सृष्टीत सौंदर्य खेळे
दावीत सतत रूप आगळे
असे एक गाणे आहे. शांता आपटेंनी अभिनित केलेल्या या गाण्यात वाद्यमेळ म्हणून नेहमीच्या वाद्यांऐवजी चक्क पळी ताम्हन यासारख्या वस्तूंचा वापर केला आहे. संपूर्ण गाणे तसेच केले आहे. आणि तो प्रयोग त्यावेळी नक्कीच गाजला असणार यात शंका नाही. मग प्रश्न असा, की देवघरातल्या या भांडय़ांच्या आवाजातही संगीत आहे का? मग एवढे वाद्यप्रकार का जन्माला आले? तर विषय रास्त आहे. स्वरांच्या अचूकतेला आणि सूक्ष्मतेलाही तितकेच महत्त्व आहे. म्हणून या विषयावर होईल तितके संशोधन कमीच असते. असो. पहाटेसच आपण मोराची केका ऐकतो. केवढे सुरेल ?संगीत असते त्यात! कोकिळेचा पंचम हे तर सांगीतिक सत्य आहे. किंबहुना असे पक्ष्यांचे आवाज, लाटांचा आवाज, समुद्राची गाज, विजेचा कडकडाट, प्रवाहाच्या आवाजातली विविधता, पागोळय़ांची टपटप या सगळय़ातच संगीत आहे.
कितीतरी गाण्यांमध्ये टेनचा आवाज, घोडय़ाच्या टापांचा आवाज, इंजिनचा आवाज आणि इतर असंख्य प्रकारचे आवाज म्युझिक पीसेस म्हणून वापरलेले आहेत. ‘मामाच्या गावाला जाऊया’ या गाण्यात नाही का गाडीच्या शिट्टीचा आवाज वापरला आहे? तसेच ‘चिंगारी कोई भडके’ मध्ये वापरलेल्या म्युझिकला पाण्याच्या लाटांचा इफेक्ट असा काही आहे की कमाल..तसेच ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ च्या सुरुवातीचा पीस चक्क दोन काचेच्या ग्लासांचा एकमेकांवर नाजुकपणे आघात करून निर्माण केलेला होता. तो आजपर्यंत गाजतो आहे.
गॅलरीत टांगलेल्या विंडचाइमचा आवाज. एखाद्या अख्ख्या प्रसंगाला तो पुरेल! त्या आवाजाचा निर्माता हा वारा असतो. मानवनिर्मित आवाज हा नव्हे. पण किती मधुर संगीत त्या हालचालीतून निर्माण होते. पाण्याची भांडी जेव्हा आतले पाणी ज्या पातळीवर असेल त्याप्रमाणे हिंदकळतात. तीच संकल्पना वापरून जलतरंग नामक एक अतिमधुर वाद्य तयार होते आणि अखंड रागप्रस्तुती त्यातून होते. शंख हे एक रणवाद्य म्हणून प्रचलित आहे, पण त्याच शंखाला कान लावून पहा. समुद्राच्या गाजेचा आवाज येतो. सगळी गंमत आहे ती त्या हवेची! मी लहान असताना आमच्याकडे शिमग्याचे नाचकाम करणारे बरेच लोक येत असत. त्या मेळय़ात तुणतुणे असे. ते तिथल्याच स्थानिक कलाकाराने तयार केलेले असे. फक्त एकच तार! पण तेवढय़ा तारेच्या जिवावर त्या गोमूचे, कोळणीचे अख्खे गाणे पार पडत असे. एरवी ती तार वाजवून बघा. तुमच्या घरातले लोक काहीतरी फेकून मारतील! काय तुणतुणे लावले आहे म्हणून. पण तेव्हा ते तंबोऱयाचे काम करते.
बासरी हे अस्सल भारतीय वाद्य, जे आपल्या श्रीकृष्ण योगेश्वराने खरे लोकप्रिय केले आहे, त्याची जडणघडण पाहिली तर तर किती साधी! अक्षरशः विशिष्ट प्रकारची छिद्रे असलेली एक साधी सरळ फुंकनळी. आणि तिचे उगमस्थान कुठे? तर बांबूच्या वनातून वाहणाऱया वाऱयामुळे होणारा वंशनाद! पण ती एकदा धरून फुंकून पहा. मग कळेल त्यातून निघणाऱया ध्वनीला गोंगाटापासून वर वर नेऊन नादाच्या लेव्हलपर्यंत चढवणे म्हणजे केवढे दिव्य आहे ते! असेच तर असते. तीच गोष्ट मातीच्या माठाची. त्यावर आघात करून ध्वनि कुणीही निर्माण करतो. पण ज्याच्या मनात संगीतकला खोलवर भिनली आहे असे विद्वान विक्कू विनायकम् यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व त्याच घटम्वर तालाचे अद्वितीय विश्व उभे करते. ते का? तर ध्वनि आणि नाद या दोन्ही गोष्टींचा मेळ ते लीलया घालतात म्हणूनच. कारण जेव्हा या दोहोंमधला फरक माणसाच्या मनाला पक्का उमजतो तेव्हाच त्यातले गाळायचे काय आणि पाळायचे काय हे तो ठरवू शकतो. एकेक कडी जोडत जोडत आपण इथेपर्यंत आलो आहोत. म्हणजे शेवटी आपल्याला असा विचार करावा लागेल की ध्वनि सर्वत्र आणि नाद मात्र निवडक. मग ध्वनितले फक्त विशिष्ट ध्वनीच वापरायचे का? बाकीचे काय निरुपयोगी समजायचे? तर नक्कीच नाही. काळी चारच्या पट्टीतला जुळलेला जो तंबोरा असतो त्यातही आणि काळी एकच्या तंबोऱयातही प आणि सा मधले अंतर हे ठरल्याप्रमाणे सारखेच असते. पण म्हणून एका पट्टीचा प दुसऱया सा ला समांतर थोडाच जोडता येणार आहे? तो बेसूरच वाजणार. कारण अंतर भलेही सारखेच असेल पण स्वरपातळी बदलते ना? म्हणजेच एक नाद हा भलत्याच ठिकाणी आणि तिसऱयाच विजोड स्वराशी जोडला तर तो नुसताच एक ध्वनि (खरेतर गोंगाटच) होईल. स्वर तोच आहे. पण त्याचे नाद असणे इतक्मया सगळय़ा गोष्टींवर ठरते. जगातला हरेक ध्वनि नाद निर्मितीसाठी वापरला जाऊ शकतो. अगदी कौलावर ओढलेला पत्र्याच्या तुकडय़ाचा आवाजही! प्रश्न येतो तो त्याच्याशी असणाऱया बाकीच्या मेळाचा! त्या ध्वनिची कंपने आपल्या कानाला सहन होण्याइतपत हवीत. त्याला पूरक असे इतर ध्वनि मिळून एक श्रवणीय आवाज निर्माण करू शकले पाहिजेत. आणि हवी ती अचूकता आणि सूक्ष्मता गाठता येण्याची दोन्ही बाजूला तयारी. मग काय, दगडांचेही टाळ होतात. पत्र्याच्या डब्याचेही तालवाद्य होते. आदिवासी समाजातली असंख्य वाद्ये काय कुणी यंत्रे वापरून तयार करू शकेल? नाही. तेथे पाहिजे जातीचे! जगातल्या असंख्य ध्वनिंच्या कल्लोळात ‘नाद’ अचूक शोधून काढून तो योग्य पद्धतीने सादर करता यायला हवा असेल तर मग ‘स्टे टय़ून्ड’ असेच म्हणावे लागेल.
अपर्णा परांजपे-प्रभु








