प्रतिनिधी / सांगली
जगभरातील निवडक प्रसिद्धी माध्यमांच्या अपप्रचारास चोख प्रत्युत्तर देत देशातील तब्बल ६५ कोटी १५ लाख लोकसंख्येच्या लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठणाऱ्या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी लसीकरणात महाराष्ट्र मात्र अजूनही रेंगाळलेलाच असून लसीकरणाबाबतच्या धोरणलकव्यामुळे लस मिळविण्याकरिता राज्यातील जनतेची केविलवाणी धडपड सुरू आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत आठव्या क्रमांकावर असूनही लसीकरणाबाबत स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या ठाकरे सरकारने लसीकरणाचा निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखून कोरोना रोखण्याच्या केंद्राच्या यशाचा कित्ता गिरवावा अशी मागणी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी बुधवारी केली आहे.
भारतासारख्या गरीब देशात ऑगस्टपूर्वी ६० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला जाणार नाही, असा अपप्रचार काही आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरून सुरू होता. मात्र, ३१ ऑगस्ट रोजी तब्बल ६५ कोटी १२ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करून मोदी सरकारने या अपप्रचारास चपराक लगावली आहे. याच वेगाने राज्यांनी देखील लसीकरण करावे व निश्चित धोरण आखून राज्यातील सर्व नागरिकांना वेळेवर लस उपलब्ध करून द्यावी याकरिता लशीच्या मात्रांचे नियोजनबद्ध वाटपही केंद्र सरकारने केले असून महाराष्ट्रास गरजेहून अधिक मात्रा उपलब्ध झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रास ८६ लाख ७४ हजार लस मात्रा वितरित करण्यात येणार होत्या. त्याऐवजी प्रत्यक्षात ९१.८१ लाख म्हणजे पाच लाखांहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. असे असतानाही, राज्याच्या अनेक लसीकरण केंद्रांवरून आजही नागरिकांना हात हलवत परतावे लागत आहे, तर अनेक केंद्रांवर लस नसल्याचे कारण देत ऐनवेळी लसीकरण थांबविले जात आहे. ठाकरे सरकारकडे लसीकरणाचा नेमका कार्यक्रम नाही आणि मोफत व सशुल्क लसीकरण वाटपाचे धोरणही नाही त्यामुळे जनतेचे हाल सुरूच आहेत, असा आरोप. संजय काका यांनी केला आहे.