वार्ताहर/ राजापूर
देशावर आलेल्या कोरोना संकटाच्या काळात आरोग्य, पोलीस तसेच स्वच्छता कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या कर्मचाऱयांप्रती कृतज्ञता म्हणून राजापूर शहरालगत धोपेश्वर गुरववाडी येथील भजनी बुवा तुकाराम गुरव यांनी गणेशोत्सवात ‘कोविट सेंटर’चा देखावा उभा केला आहे. टाकाऊ वस्तूंपासून साकारलेला हा इकोप्रेंडली देखावा गणेशोत्सवात आकर्षण ठरत आहे.
सध्या अवघ्या जगावर कोरोना महामारीचे संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी कोविड योद्धे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांचे योगदान फार मोठे आहे. कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड टेस्ट सेंटर उभारण्यात आली आहेत. कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱया रूग्णांसाठी तेथील सर्व कर्मचारी देवदूत ठरत आहेत. गणेशोत्सवानिमित्ताने कोरोना संकटाशी सामना करणाऱया या सर्व योध्दय़ांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना समाजाला एक चांगला संदेश मिळावा, या हेतूने धोपेश्वर गुरववाडी येथील भजनीबुवा तुकाराम गुरव यांनी कोविड सेंटरची प्रतिकृती साकारली आहे.
कोविड सेंटरमध्ये असलेली व्यवस्था, डॉक्टर, नर्स तसेच पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी देखाव्यात दाखवण्यात आले आहेत. संपूर्ण देखावा इकोप्रेंडली असून कागद, पुठ्ठे याच्या सहाय्याने ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरोना आजाराबाबत काही संदेशही देण्यात आले आहेत. राजापुरात सध्या हा देखावा सर्वांचे आकर्षण ठरत असून देखावा साकारणाऱया कलाकारांचेही कौतुक होत आहे. हा देखावा साकारण्यासाठी सौरभ गुरव, रूपेश गुरव, अंकित गुरव, सिद्धांत गुरव, साईप्रसाद गुरव, सुनील गुरव, सार्थक, सुमीत गुरव, रूतिक गुरव यांनी बुवा तुकाराम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य केले.









