यंदा आयपीएल स्पर्धेतील सर्व संघांचे पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी 7 सामने पूर्ण झाले असून त्यात चेन्नई सुपरकिंग्स संघाचे निराशाजनक प्रदर्शन सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का देणारे ठरले आहे. चेन्नईला आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले असून हीच मालिका कायम राहिली तर त्यांच्यासमोर आयपीएल इतिहासात प्रथमच प्ले-ऑफपूर्वीच बाहेर फेकला जाण्याचा धोका असणार आहे.
यंदा प्रारंभापासूनच चेन्नईला धक्के सोसावे लागत आले आहेत. प्रारंभी, त्यांच्या पथकातील 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आणि यामुळे सर्व पथकाचा क्वारन्टाईन कालावधी वाढवावा लागला. साहजिकच, संघाच्या सराव सत्राला सर्वात उशिराने सुरुवात झाली. त्यातच सुरेश रैना व हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतल्याने आणखी खळबळ उडाली. प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर चेन्नईचे खराब प्रदर्शन अधिक चिंतेचे ठरले.
वास्तविक, चेन्नईने त्यांनी खेळलेल्या प्रत्येक आयपीएल हंगामात किमान प्ले-ऑफ गाठले आहे. आजवर त्यांनी तीनवेळा जेतेपद (2010, 2011 व 2018) आणि पाचवेळा उपजेतेपद (2008, 2012, 2013, 2015 व 2019) मिळवले आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघात त्यांचा आवर्जून समावेश राहिला आहे. यंदा मात्र 14 पैकी 7 सामन्यात त्यांना केवळ दोनच विजय मिळवता आले असून यामुळे प्रथमच त्यांच्यासमोर प्ले-ऑफपूर्वीच गारद होण्याचे संकट असणार आहे. अर्थात, धोनीचे नेतृत्व हे चेन्नईचे बलस्थान असून याच बळावर त्यांना उर्वरित टप्प्यात चमत्काराची अपेक्षा आहे.
चेन्नईला वयस्कर खेळाडूंच्या अधिक समावेशामुळे ‘डॅडस् आर्मी’ म्हणून हिणवले जाते. पण, संघातील वरिष्ठ खेळाडूंचा अनुभवच कामी यावा, अशी चेन्नईच्या व्यवस्थापनाची आणि चाहत्यांची अपेक्षा असणार आहे. ही अपेक्षा फलद्रुप होणार का, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होऊ शकेल.