वृत्तसंस्था/ मुंबई
प्रदीर्घ कालावधीपासून व्यावसायिक क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी पुनरागमन करत असल्याने यंदाची आयपीएल स्पर्धा अधिक खास स्वरुपाची असेल, असे प्रतिपादन माजी विस्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागने केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर धोनीसाठी ही पहिलीच क्लब स्पर्धा असेल.
‘माझ्या मते ही स्पर्धा सर्वांसाठीच खास असेल. खेळाडूंसाठी आणि चाहत्यांसाठी देखील. माहीला क्रिकेटच्या मैदानावर परतताना पाहणे विशेष आनंददायी असेल. या स्पर्धेत खूप काही दडलेले असेल. सर्वांनाच या स्पर्धेबद्दल कमालीची उत्सुकता आहे’, असे सेहवाग पुढे म्हणाला.
धोनीने यापूर्वी ऑगस्टच्या मध्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती स्वीकारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता तो आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार म्हणून नव्या पर्वाला प्रारंभ करेल. शनिवार दि. 19 रोजी चेन्नई सुपरकिंग्सची सलामी लढत मुंबई इंडियन्सविरुद्ध अबु धाबी येथे खेळवली जाणार आहे.
क्रिकेट हा भारतीयांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे आणि व्यावसायिक क्रिकेट लढतीसाठी येथील क्रिकेटप्रेमींनी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा केली आहे, याचा सेहवागने पुढे उल्लेख केला.
‘लॉकडाऊन सुरु असताना मी जुने सामने पाहण्यात, त्याचे विश्लेषण करण्यात माझा वेळ व्यतित केला. अगदी मी माझ्या डावांचेही निरीक्षण केले. खरं तर सर्व भारतीयांचा क्रिकेट हा जणू श्वासच आहे’, असे त्याने शेवटी नमूद केले.
ऋतुराज गायकवाडच्या उपलब्धतेची शक्यता कमी

मागील महिन्यात कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झालेला चेन्नई सुपरकिंग्स संघाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड अद्यापही विलगीकरणातच असून तो मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱया आयपीएल सलामीच्या लढतीत खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. ऋतुराज उत्तम स्थितीत आहे. पण, अद्याप संघाच्या जैवसुरक्षित वातावरणात प्रवेश करण्यासाठी त्याला बीसीसीआयकडून परवानगी मिळालेली नाही, असे चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले.
‘बीसीसीआयकडून ऋतुराजला परवानगी मिळण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. पहिल्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे. पण, लवकरच संघाच्या जैवसुरक्षित वातावरणात दाखल होण्यासाठी त्याला हिरवा कंदील दर्शवला जाईल’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चेन्नईच्या पथकातील 13 सदस्य मागील महिन्यात कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यात ऋतुराज गायकवाड व दीपक चहर या दोन खेळाडूंचा समावेश होता. यापैकी चहर व अन्य 11 जण त्यातून पूर्ण सावरले. चहरने दोन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सरावाला देखील सुरुवात केली. ऋतुराजला मात्र बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने अद्याप यासाठी परवानगी दिलेली नाही.









