नवी दिल्ली / वृत्तसंस्था
डावखुरा यॉर्कर स्पेशालिस्ट थंगसरु नटराजनने मागील आयपीएल हंगामात माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून मिळालेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असल्याचे सांगितले. धोनीने त्यावेळी नटराजनला स्लो बाऊन्सर्स व कटर्स टाकण्याची सूचना केली होती. या मार्गदर्शनाचा नटराजनला त्याच्या पुढील वाटचालीत लाभ झाला.
30 वर्षीय नटराजनने मागील आयपीएल हंगामात सर्व जलद गोलंदाजांमध्ये सर्वाधिक 71 यॉर्कर टाकले असून धोनी, एबी डीव्हिलियर्ससारख्या दिग्गजांना त्याने बादही केले आहे.
‘धोनीसारख्या अव्वल खेळाडूंशी संवाद साधणे, त्यांचे मार्गदर्शन घेणे नेहमीच उपयुक्त ठरते, असा माझा अनुभव आहे. धोनीने त्यावेळी माझ्याशी फिटनेसबद्दल चर्चा केली. शिवाय, स्लो बाऊन्सर्स, कटर्स टाकण्यावर भर देण्याची सूचना केली. हा बदल केल्याने माझ्या गोलंदाजीत वैविध्यता आली’, असे नटराजन म्हणाला.
सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱया नटराजनने मागील हंगामात धोनीला बाद केले होते आणि नंतर भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयात नटराजनला आश्चर्यकारक संधी मिळाली होती. प्रारंभी त्याचा राखीव खेळाडूत समावेश होता. मात्र, नंतर त्याला अंतिम एकादशमधून खेळता आले.
मागील आयपीएल स्पर्धेत डीव्हिलियर्सला बाद केले, त्याच दिवशी नटराजनला कन्यारत्न झाले. मात्र, याची त्याने सहकाऱयांना प्रारंभी कल्पना दिली नव्हती. सामना संपल्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने याची माहिती सर्वांना दिली. यंदा नटराजनचा सनरायजर्स हैदराबाद संघ रविवारी केकेआरविरुद्ध आपल्या आयपीएल मोहिमेला प्रारंभ करणार आहे.









