वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे पहिले मार्गदर्शक देवल सहाय यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. रांचीमधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. 73 वर्षीय सहाय यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.
रांचीमध्ये पहिली टर्फ खेळपट्टी तयार करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांचे खरे नाव देवव्रत असे होते. पण देवल या नावाने ते जास्त लोकप्रिय होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तेथे त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. 9 ऑक्टोबर रोजी त्यांना घरी जाऊ देण्यात आले होते. ‘दहा दिवस घरी राहिल्यानंतर त्यांची तब्बेत पुन्हा बिघडल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली,’ असे सहाय यांचे सुपुत्र अभिनव आकाश सहाय यांनी सांगितले. इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या सहाय यांनी सीसीएल कंपनीत असताना धोनीला स्टायपेंडवर ठेवून घेतले आणि त्याला टर्फ खेळपट्टीवर खेळण्याची पहिली संधी मिळवून दिली होती. धोनीच्या जीवनावरील चित्रपटातही त्यांचे पात्र दाखविण्यात आले आहे.