प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीसाठी निवडणुक प्रक्रिया चालू झाली आहे. यात तालुक्यातील सोळा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, बार्शी तालुक्यातील धोत्रे या गावची ग्रामपंचायत सुद्धा बिनविरोध झालेली आहे. मात्र या गावाचे वैशिष्ट्य असे की या गावातील ग्रामपंचायत बिनविरोध होत असताना या गावातील सर्व बिनविरोध उमेदवार हे माजी सैनिक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माजी सैनिकांच्या हाती ग्रामपंचायत देणारे धोत्रे हे एकमेव गाव ठरले आहे. धोत्रे या गावाचे कौतुक करण्यासाठी आज बार्शी बाजार समिती याठिकाणी या बिनविरोध ग्रामपंचायतीतील सदस्यांचा सत्कार समारंभ आमदार राऊत यांनी आयोजित केला होता. यावेळी या गावातील नऊ निर्वाचित बिनविरोध सदस्यांसह बार्शी बाजार समितीचे सचिव रावसाहेब मंनगीरे बाबासाहेब बसले सचिन मडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी आमदार राऊत यांनी धोत्रे गावचे कौतुक करत, या गावाने माजी सैनिकांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड केल्याने बार्शी तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर आणि देशभर गाजले आहे. तसेच सैनिकांमध्ये असणारी शिस्त या गावच्या ग्रामपंचायतीसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला तर आपल्या आमदार निधीमधून भावी काळात या गावाला विकास कामे करण्यासाठी पंधरा लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले. बार्शी तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांची बिनविरोध निवडीत यामध्ये वार्ड क्रमांक १ मधून सचिन शहाजी लांडे ,शालन चंद्रकांत घोडके,नंदा दत्तात्रय सुरवसे,वार्ड २ मधून सुमंत प्रभू जाधवर,गणेश मालोजी मोरे ,उल्फानबी जमादा शेख आणि वार्ड ३ मधून वंदना मोहन जाधवर,मंगल सुरेश जाधवर,बुवासाहेब रामचंद्र बोकेफोडे अशी बिनविरोध निवड करण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत.
देशाच्या रक्षणासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी काम करण्याची संधी देऊन धोत्रे गावकऱ्यांनी एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे याबद्दल सर्व थरातून कौतुक केले जात आहे.









